बेल्हे:-एकेकाळी गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणामुळे राज्यभर चर्चेत असलेली पुणे जिल्हा परिषदेची बेल्हे जिल्हा परिषद शाळा आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.शाळेत शिक्षणापेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व दिले जात असल्याचा गंभीर आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केला आहे.शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा संशय व्यक्त करत अनेक पालकांनी तीव्र नाराजी नोंदवली.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी उभारलेली ही शाळा आता अंतर्गत राजकारण आणि गटबाजीचे केंद्र बनत चालली आहे. त्यामुळे काही पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश दुसऱ्या शाळांमध्ये घेतल्याचा दावा बैठकीत करण्यात आला. “शाळा ही शिक्षणाचे मंदिर असते; ती राजकारणाचा आखाडा होऊ नये,”अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे,या शाळेच्या गुणवत्तेची दखल घेत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शाळेला भेट देत विविध उपक्रमांचे कौतुक केले होते.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सुनील चोरे कुटुंबाकडून देण्यात आलेल्या उपक्रमाचे उद्घाटनही या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते झाले होते.अशा गौरवशाली परंपरा असलेल्या शाळेत आज राजकारणाचे आरोप होत असल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणूक प्रक्रियेत काही बाबींवर प्रश्न उपस्थित करत पालकांनी संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक करण्याची मागणी केली.या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी,अशीही मागणी करण्यात आली.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, महिला सदस्य,ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते शंकर शिंदे,भाऊसाहेब शिरतर,नजीम बेपारी,मुख्याध्यापक तथा निवडणूक निर्णय अधिकारी,निलेश पाबळे, अमर बांगर, वैशाली मटाले, ईश्वर पिंगट यांच्यासह अनेक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सध्या या प्रकरणामुळे बेल्हे परिसरात शिक्षण व्यवस्थेवर आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,संबंधित विभागाने याची गंभीर दखल घेऊन वस्तुस्थिती समोर आणावी,अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.