आळेफाटा:-रक्षाबंधनाच्या निमित्ताने,बाजार पेठेत राख्यांची दुकाने सजली आहेत.बहिण-भावाच्या नात्याचा हा सण उत्साहात साजरा होत असताना आळेफाटा चौकात मात्र एका दिव्यांग तरुणाचा संघर्ष अनेकांना थांबून विचार करायला लावणारा आहे.दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावलेली असतानाही शैलेश गुलाब कुटे हा तरुण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आळेफाटा चौकात राख्यांचा स्टॉल लावून व्यवसाय करत आहे.
पिंपरी पेंढार येथील शैलेश गुलाब कुटे याची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.वडील गुलाब बन्सी कुटे हे लहानपणापासूनच मूकबधिर असूनही उत्कृष्ट ट्रॅक्टर चालक म्हणून कुटुंबाचा आधार बनले.आई मीना गुलाब कुटे या साध्या-भोळ्या स्वभावाच्या असून शेतमजुरी करून संसाराला हातभार लावत आहेत.
शैलेशच्या आयुष्याची संघर्षकहाणीही तितकीच कठीण आहे.लहानपणीच त्याचा एक डोळा गेला,तर दहावीमध्ये शिकत असताना दुसऱ्या डोळ्याचीही दृष्टी गेली. डोळ्यांसमोरचा प्रकाश हरपला;मात्र जगण्याची उमेद आणि स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्याने सोडली नाही.
शैलेशची पत्नी सोनाली शैलेश कुटे त्याच्या संसारात सोबत आहे.शीतल भोर आणि पूजा फापाळे या त्याच्या दोन बहिणी आहेत.परिस्थितीने अनेक अडचणी समोर उभ्या केल्या,मात्र शैलेशने त्या अडचणींना कारण बनवण्याऐवजी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्याने आळेफाटा चौकात राख्यांचा स्टॉल लावला आहे.दृष्टी नसतानाही ग्राहकांशी संवाद साधत,राख्यांची विक्री करत आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करताना त्याची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात छोट्या-छोट्या अडचणींनी खचून जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र शैलेशसारखा तरुण डोळ्यांची दृष्टी नसतानाही स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी धडपडतोय. त्याच्याकडे पाहिल्यावर जाणवतं की डोळे असणे आणि डोळसपणे जगणे यात किती मोठा फरक आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या मनगटावर बांधली जाणारी राखी ही केवळ प्रेमाची खूण नसते;ती नात्याची, आधाराची आणि जबाबदारीची आठवण करून देते.
आळेफाटा चौकात राख्या विकणारा शैलेश मात्र आपल्या कुटुंबासाठी स्वतःच आधार बनून उभा आहे.त्याच्या संघर्षाकडे पाहताना समाजाने केवळ त्याची परिस्थिती पाहू नये,तर अडचणींवर मात करण्याची त्याची जिद्दही पाहावी,हाच या रक्षाबंधनाच्या निमित्ताने मिळणारा खरा संदेश आहे.