वडगाव आनंद : कामिका एकादशीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे याही वर्षी आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव आनंद येथे रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी भव्य शालेय बालदिंडी सोहळ्याचे आयोजन डी बी नाना वाळुंज यांच्या प्रेरणेने सन २०१० पासून सुरू असलेला हा सोहळा यावर्षी देखील मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. ‘ज्ञानोबा-माऊली’, ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषाने संपूर्ण शालेय परिसर व गाव दुमदुमून गेले.
सकाळी ठीक ९ वाजता शाळेच्या प्रांगणात पालखी पूजन करून गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या भजनाने बालदिंडीची सुरुवात झाली. सन २०१० पासून शाळेने ही परंपरा जपत शाळेचे माजी विद्यार्थी हरी नाना देवकर व गावातील सर्वच सांप्रदायिक मंडळी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवताना मुलांवर खऱ्या अर्थाने संस्कार कसे होतील याकडे लक्ष देत असतात. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभाग घेतला. शाळेच्या मैदानात भव्य रिंगणाचे आयोजन करण्यात आले. या रिंगणात विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने व टाळ पथकाने नेत्रदीपक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर पालखी व बाल वारकऱ्यांची दिंडी शाळेपासून मोक्षधाम मंदिर, मुख्य चौक मार्गे गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचली. मंदिरात पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर गावातील मुख्य चौकात महिला, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी फुगडी, बस फुगडी, काठवटी-काना यांसारख्या पारंपरिक खेळांचे सादरीकरण केले.
बाल दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव, संत तुकाराम आदी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. हाती भगव्या पताका आणि डोईवर तुळस घेऊन बाल वारकरी मोठ्या उत्साहाने या बाल वारीत सहभागी झाले होते. विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ असे सुमारे ६०० भक्तजन या सोहळ्यात सहभागी झाले.
“वारकरी संप्रदायाची शिकवण, संतांचे विचार आणि आपल्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या बालदिंडी सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे,” असे शिक्षणतज्ज्ञ डी. बी. नाना वाळुंज यांनी सांगितले.
बालदिंडीच्या सांगतेनंतर शाळेत विद्यार्थ्यांसह उपस्थित भाविकांना खिचडी, केळी व राजगिरा लाडू असा महाप्रसाद वाटप करण्यात आला. यासाठी पालकांनी खिचडी तर उपसरपंच संतोष पादिर यांनी केळी तर संदीप गडगे यांनी राजगिरा लाडूचे वाटप केले, देवस्थान अध्यक्ष कैलास वाळुंज व सदस्यांनी यांनी गावात मुलांना केळीचा प्रसाद वाटप केले. तसेच परिसरातील प्रत्येकाच्या कानापर्यंत आवाज पोहचविण्यासाठी योगेश देवकर यांनी डिजे सुविधा उपलब्ध करून दिली. या उपक्रमाला पालक व ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले.
बालदिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले पाटील, मुख्याध्यापक सुनील ठिकेकर तसेच शिक्षक छाया डुंबरे, सुनंदा तांबे, गीतांजली वाळुंज आणि सविता खेत्री तसेच कोरोग्राफर शीतल जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.