दशक्रिया घाटावर वाढली राजकीय नेत्यांची भाषणबाजी

बेल्हे(प्रतिनिधी): जुन्नर तालुक्यात सध्या दशक्रिया विधी म्हणजे राजकीय नेत्यांच्या भाषणबाजीची केंद्रे बनल्याने,दशक्रियेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जुन्नर तालुक्यात बहुतांश गावच्या दशक्रियेत श्रध्दांजली वाहणाऱ्यांची संख्या आठ दहाच्या कमी नसते,एवढ्या मोठ्या संख्येने भाषणबाजी करत श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांची संख्या असेल तर उपस्थित असलेल्या(त्यातही उन्हात बसलेल्या)श्रोत्यांचे काय हाल होत असतील याची कल्पनाच केलेली बरी,बऱ्याचदा या मंडळीना वेळेचे भान न पाळता श्रध्दांजलीच्या नावाखाली लांबलचक व रटाळ भाषणबाजी करतात.

काकस्पर्श होईपर्यंत श्रद्धांजलीपर दोन शब्द बोलणे अपेक्षित असताना काकस्पर्श झाल्यानंतर सुध्दा तासभरापेक्षा जास्त वेळ या मंडळींची भाषणबाजी सुरूच राहते,दशक्रियेच्या निमित्ताने जमलेल्या आयत्या गर्दीचा फायदा ही मंडळी भाषणबाजी व प्रसिध्दीसाठी करतात.

अनेकदा या मंडळींना मृत व्यक्तीच्या जीवनमानाबद्दल काहीही माहिती नसतानाही भरभरून बोलतात,तर कधी कधी उपस्थित असलेल्या राजकीय विरोधकांची उणीदुणी काढण्याचे तसेच एकमेकांना टोमणे मारण्याचे किस्सेही दशक्रिया घाटावर घडले आहेत,त्यामुळे दशक्रिया विधी घाटाचा वापर राजकीय व्यासपीठासारखा होऊ लागल्या सारखे होत असल्याचे बोलले जाते.

या भाषणबाजीमुळे दशक्रिया विधीचा मूळ उद्देशच दुर्लक्षिला जात असून वेळेचे भान न पाळल्याने विधीचे पावित्र्य सुध्दा हरवले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया जाणकर वयोवृद्ध मंडळींकडून व्यक्त होत आहेत.

दशक्रिया घाटावर उपस्थित राहिलेल्या जनसमुदायाचा वेळ नाहक वाया जातो,घाटावर आलेली बहुतांश मंडळी शेतकरी आहेत,याचेही भान बोलण्याच्या नादात यांना राहत नाही,ही शोकांतिका आहे.

शेतकऱ्यांसाठी सकाळची वेळ अत्यंत महत्वाची व मौलिक असते.दिवसभराच्या कामकाजाचे नियोजन करण्याबरोबर त्यासाठी मजुरांसह आवश्यक त्या साधनांची जमवाजमव करण्याची ही वेळ असते,मात्र सकाळी आठ वाजता सुरू होत असलेले दशक्रिया विधी पुढाऱ्यांच्या भाषणबाजीमुळे कमीतकमी दहा वाजेपर्यंत लांबतात,यात गैरहजर असलेल्या खासदार,आमदार व अन्य लहानमोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन मी त्यांच्या फार जवळचा आहे असे दाखवण्यासाठी त्यांच्यावतीने शोक व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या ‘कार्यकर्त्यांची’ जणू स्पर्धाच लागलेली असते.

दरम्यान काकस्पर्श झाल्यानंतर दशक्रियेसाठी बोलणाऱ्या वक्त्यांची संख्या मर्यादित ठेवण्याबाबत गावागावांच्या ग्रामस्थाच्या बैठकीत ठराव करुन ठरावांचे नियमांचे पालन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे तरच भाषणबाजीला आळा बसेल असे मत व्यक्त करताना एका जानकर व्यक्तीने दशक्रिया विधी कार्यक्रमात उपस्थिताना अरे यांना कोणीतरी आवरा हो म्हणायची वेळ येणार नाही असे सांगितले.