गावातील सर्वच रस्त्यांवर सीसीटीव्ही असल्याने आळे गावातील ग्रामस्थांना आता लागणार सुखाची झोप

बेल्हे,दि.(प्रतिनिधी)आळे(जुन्नर)गावातील ग्रामस्थांना आता सुखाची झोप लागणार आहे.ग्रामपंचायतीच्यावतीने गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावास जोडणाऱ्या लहान मोठ्या सर्वच रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

गावात विविध २५ ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून कॅमेऱ्यांचे नियंत्रण केले जाणार आहे.आळे गावात मागील काळात चोरांनी धुमाकूळ घातला होता.अनेक छोट्या-मोठ्या चोऱ्यांसह वाहन चोरीचे प्रकार घडले होते.यातून गावात असुरक्षिततेचे वातावरण होते.

सरपंच प्रीतम काळे,उपसरपंच अॅड.विजय कुन्हाडे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. गावातील बहुतांश नागरिक शेतकरी व व्यावसायिक आहेत. त्यामुळे दिवसा गावात शुकशुकाट असतो.त्यामुळे गावातील सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी नगर-कल्याण महामार्गासह लहान मोठ्या सर्वच रस्त्यावर, ग्रामपंचायत कार्यालय, गावातील बाजारपेठ, सरकारी दवाखाना,शाळा,गावातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वेशीवर आदी ठिकाणी २५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

यामुळे गावातील चोऱ्या, दरोडे आणि रस्त्यावर घाण करणाऱ्यांसह इतर गैरप्रकारांना देखील आळा बसणार आहे.शासकीय कर्मचारी कधी येतात कधी जातात यावरही ग्रामपंचायतीची नजर असेल.सोबतच आळे गाव दुसऱ्या गावांमध्येही चर्चेचा विषय बनला आहे. आता आसपासची गावेही आपले गाव असेच बनवण्याची योजना तयार करत आहेत.

अनेकवेळा आळे गावात सीसीटीव्ही नसल्याने पोलिस यंत्रणा व ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत होता.सीसीटीव्ही कॅमेरे गावात बसवण्याची मागणी अनेक दिवसांची होती, गावास जोडणाऱ्या लहान मोठ्या सर्वच रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे.चोऱ्यांचे वाढते प्रमाण आणि वाढती गुन्हेगारी नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. रस्त्यावरील अपघात आणि वाहन चोऱ्यांवरही आता नजर ठेवता येणार आहे. गावाची सुरक्षा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे उपसरपंच अॅड. विजय कुन्हाडे यांनी सांगितले.