पारगाव, दि.(प्रतिनिधी)पारगाव तर्फे आळे(ता.जुन्नर)येथे, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेजवळ मैदानात खुलेआम दारुची विक्री होत आहे.त्यामुळे येथील अवैध विक्रीवर पोलिसांचा यावर वचक आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथे,जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेजवळ गेल्या काही वर्षांपासून राजरोसपणे गावठी दारूसह देशी विदेशी दारूची विक्री होत असताना उत्पादन शुल्क विभाग आणि नारायणगाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडून एकदाही छापा टाकून कारवाई केली गेली नसल्याचे बोलले जाते.
पारगाव तर्फे आळे गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेजवळ खुलेआम अनधिकृतपणे देशी विदेशी दारुची विक्री होत आहे.मात्र कारवाई होत नसल्याने या अवैध दारू व्यवसायाला मोठा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दिवसाढवळ्या राजरोसपणे दारुची विक्री होत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
दरम्यान पारगाव तर्फे आळे येथे प्राथमिक शाळेजवळ अनधिकृतपणे सुरु असलेली दारु विक्री बंद करण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग पुढाकार घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे नारायणगाव कार्यालयाचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाही, त्यामुळे त्यांची भूमिका समजू शकली नाही.