आणे : जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असताना पेमदरा न्यहर वस्ती येथे आज एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.बिबट्या पकडला गेल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पेमदरा न्यहर वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.शेतकरी,महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या अडकला.
दरम्यान, जुन्नर तालुक्यात बिबट्यांची समस्या गंभीर होत असून केवळ बिबट्या पकडण्यापुरती कारवाई न करता त्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात,अशी मागणी पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर यांनी केली.
बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने संवेदनशील भागात नियमित गस्त वाढवावी, बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात तातडीने उपाययोजना कराव्यात आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.