अनुराग हांडेची २० किमी चालण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

बाळासाहेब जाधव महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; चार जिल्ह्यांतील खेळाडूंवर मात करत मिळवले यश
आळे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित आंतरविभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आळे येथील मा. बाळासाहेब जाधव महाविद्यालयाच्या अनुराग हांडे याने २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अनुरागच्या या शानदार यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दि. २१ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत अहिल्यानगर, नाशिक, पुणे शहर आणि पुणे जिल्हा या चार जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अनुरागने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्णपदकावर नाव कोरले.
ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ, आळे, संतवाडी-कोळवाडी संचलित मा. बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील अनुरागच्या या यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर उच्च पातळीवर चमकण्याची क्षमता असल्याचे अनुरागने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
अनुरागला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण जाधव तसेच शारीरिक शिक्षण संचालक डॉ. कॅप्टन रावसाहेब गरड यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले असून, आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुरागच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ. अर्जुनशेठ पाडेकर, खजिनदार अरुणशेठ हुलवळे, तसेच सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालय विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करून अनुरागचे अभिनंदन केले.
अनुरागच्या या सुवर्ण कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा आणखी समृद्ध झाली असून, त्याच्या पुढील क्रीडा कारकिर्दीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *