आळे:-आळे येथे,बाळासाहेब जाधव कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे जिल्हा क्रीडा विभागांतर्गत पुणे जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा(मुले-मुली)आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा २७ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात रंगणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मंगळवारी(दि.२७)सकाळी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष,माजी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून आमदार शरद सोनवणे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.रमेश गायकवाड,पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेशअण्णा काकडे,जुन्नर पंचायत समितीच्या सदस्या सौ.सपनाताई जीवन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे राहणार आहेत.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील मुला-मुलींचे कबड्डी संघ सहभागी होणार असून,युवा खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.कबड्डीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना,शिस्त,क्रीडाभावना,नेतृत्वगुण,खिलाडूवृत्ती विकसित करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण जाधव,शारीरिक शिक्षण संचालक डॉ. कॅप्टन रावसाहेब गरड हे निमंत्रक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.मंडळाचे उपाध्यक्ष सौरभ डोके,मानद सचिव डॉ. अर्जुन पाडेकर,खजिनदार अरुण हुलवळे व संचालक, मंडळातील सदस्य,महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षके तर कर्मचारी,विद्यार्थी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे आळे परिसरात कबड्डीचा उत्साह पाहायला मिळणार असून,जिल्ह्यातील महाविद्यालयीन खेळाडूंच्या चुरशीच्या लढती क्रीडाप्रेमीं साठी आकर्षण ठरणार आहेत.जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.