उत्पादन शुल्क विभागाच्या कृपाशीर्वादाने भोरवाडी परिसरात पुन्हा भेसळयुक्त ताडी फोफावली!

बेल्हे(प्रतिनिधी) : चौदानंबर, साळवाडी,भोरवाडी परिसरात पुन्हा एकदा भेसळयुक्त ताडीचा बिनधास्त व्यापार फोफावला असून, हा प्रकार उत्पादन शुल्क विभागाच्या कृपाशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा सर्वत्र आहे. काही महिन्यांपूर्वी नारायणगाव कार्यालयाचे अधिकारी अर्जुन पवार यांनी धडाकेबाज कारवाई करून ताडी विक्रेत्यांवर वचक निर्माण केला होता. मात्र सध्या तो वचक पूर्णपणे गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

परिसरातील अनेक ताडी विक्री केंद्रांवर खुलेआम पावडर मिश्रित ताडी विकली जात आहे. या ताडीच्या सेवनामुळे तरुणांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत, तर काही ठिकाणी शालेय विद्यार्थी व तरुण ताडीच्या आहारी गेल्याचे समोर येत आहे. येडगाव येथील एका तरुणाचा भेसळयुक्त ताडी सेवनाने मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते.

स्थानिकांचे म्हणणे आहे की, चौदा नंबर, भोरवाडी आणि साळवाडी परिसरात विक्री होणारी ताडी ही नैसर्गिक झाडांवरून निघालेली शुद्ध ताडी नसून, ती रासायनिक पावडर मिसळून तयार केली जाते. क्लोरील हायट्रिकसारखी धोकादायक रासायनिक द्रव्ये वापरून तयार केलेली ही ताडी मानवी आरोग्यास घातक ठरत आहे.

फेब्रुवारी ते जून हा ताडीचा नैसर्गिक हंगाम असतो. परंतु सध्या त्या झाडांमधून रस निघत नसतानाही ताडी विक्री सुरू आहे, म्हणजेच विकली जाणारी ताडी ही रासायनिक भेसळीचीच असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य कष्टकरी आणि दैनंदिन मजुरांचा जीव धोक्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासन आणि ताडी विक्रेते यांच्यातील साठेबाजीमुळे हा गैरप्रकार सुरू राहिला आहे. “मिल झुलकर बाटके खायेंगे” या भूमिकेतून काही अधिकारी हात झटकून बसले आहेत, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.

या सर्व गंभीर प्रकारावर उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा या विषारी ताडीचा फटका आणखी कित्येक कुटुंबांना बसू शकतो.

अधिक माहितीसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या नारायणगाव कार्यालयाशी संपर्क साधला असता संबंधित अधिकारी उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे विभागाची भूमिका समजू शकली नाही.