बेल्हे:-बेल्हे(ता.जुन्नर)येथे झालेल्या अपघातात श्यामराव बाळासाहेब घोडके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.विशेष म्हणजे,ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता, त्याच दिवशी ही दुर्घटना घडल्याने घोडके कुटुंबीयांसह परिसरावर शोककळा पसरली.
श्यामराव घोडके हे स्पष्टवक्ते,मनमिळाऊ आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते.शेती आणि मातीशी त्यांची घट्ट नाळ जोडलेली होती. अभियंता म्हणून शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी शेतीशी असलेले नाते कायम जपले.परिसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन व विविध प्रकारची मदत करण्यासाठी ते नेहमी पुढे असत.त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे विविध क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांच्या निधनाने शेतकरी आणि सामाजिक क्षेत्रातील एक सहकारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
श्यामराव घोडके हे माजी पंचायत समिती सदस्य जयवंत घोडके यांचे कनिष्ठ तर सामाजिक कार्यकर्ते विजय घोडके यांचे जेष्ठ बंधू होते.त्यांच्या अंत्यविधीसाठी तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी उपस्थितांनी घोडके यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुली,मुलगा,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अकाली निधनाने घोडके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून,बेल्हे परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.