ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात आळेतून रेडा समाधी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; भक्ती, परंपरा आणि वारकरी उत्साहाचा अनोखा संगम!

आळे:-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या श्री रेडा समाधी मंदिरातून पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघणाऱ्या राज्यातील पशूच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकमेव श्रीक्षेत्र रेडा समाधी पायी वारी पालखी सोहळ्याला बुधवारी(दि.८)सायंकाळी भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’, ‘जय जय राम कृष्ण हरी’ आणि ‘पायी हळूहळू चाला, मुखाने हरिनाम बोला’ या जयघोषांनी संपूर्ण आळे नगरी दुमदुमून गेली.

कपाळावर केसरी चंदनाचा टिळा, हातात भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, टाळ-मृदंगाच्या निनादात हरिनामाचा अखंड गजर आणि वारकऱ्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह यामुळे श्री रेडा समाधी मंदिर परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला.

पालखी प्रस्थानापूर्वी शिवनेर भूषण राजाराम महाराज जाधव, ह.भ.प. सुदाम महाराज बनकर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे माजी सचिव अजित कुऱ्हाडे, जेजुरी येथील मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष तुषार सहाने आणि सरपंच मुकुंद भंडलकर यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. त्यानंतर रामदास महाराज सहाणे यांच्याकडे वीणा सुपूर्द करण्यात आली. श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जीवन शिंदे तसेच पंढरपूर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष म्हतू सहाने व कार्याध्यक्ष भागासाहेब शेळके यांच्या हस्ते दिंडी सोहळ्याला औपचारिक प्रारंभ करण्यात आला.

यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष आनंद शिरतर, खजिनदार संजय गुंजाळ, सचिव गणेश शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रीतम काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य नेताजी डोके, व्यवस्थापक कान्हू कुऱ्हाडे, अरुण गुंजाळ यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि शेकडो वारकरी उपस्थित होते.

यंदाच्या पालखी सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील सागर वर्पे यांनी स्वखर्चाने रेडा समाधी मंदिर ते आळेगाव या सुमारे तीन किलोमीटर मार्गावर आकर्षक रांगोळ्या रेखाटून वारकऱ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. तसेच पालखीसाठी नवीन रथ उभारण्यासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य नेताजी डोके, माजी जिल्हा परिषद सदस्या नयना डोके आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रविंद्र गुंजाळ यांनी एकूण ३ लाख २ हजार रुपयांची देणगी देऊन भक्तिभावाचे दर्शन घडवले.

ही पायी वारी आळे, बेल्हे, पारगाव (मंगरूळ), हाजीटाकळी, रामलिंग, निमोणे, इनामगाव, दौंड, काळेवाडी, भिगवण स्टेशन, पळसदेव, वनगळी, संस्थान रांझणी देवाची, टेंभुर्णी आणि करकंब येथे मुक्काम करत आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे दाखल होणार आहे.

भक्ती, परंपरा, सामाजिक सहभाग आणि वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपणारा हा पालखी सोहळा यंदाही ग्रामीण भागासह शहरी भाविकांचे विशेष आकर्षण ठरत असून, पंढरीच्या विठ्ठल भेटीची ओढ घेऊन वारकरी आनंदाने मार्गस्थ झाले आहेत.