कान्हूर गटातील महिलांकडून आ. लंके यांचे अनोखे स्वागत

पारनेर(श्रीकांत चौरे):नीलेश लंके प्रतिष्ठाण व राष्ट्रवादी काँग्रेसयांच्या वतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या मोहटादेवी यात्रोत्सवातील तिसऱ्या दिवशी माता भगिनींच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र पहावयास मिळाले.

मोहटादेवीकडे प्रस्थान करण्यासाठी पारनेरच्या क्रीडा संकुलावर एकत्रित जमलेल्या माता-भगिनी गायल्या, नाचल्या आणि फुुगडयाही खेळल्या ! आ. लंके हे क्रीडा संकुलावर पोहचल्यानंतर महिलांनी लोकनेता मिळायचा नाय नीलेश लंके साहेबांसारखा या गितावर टाळया वाजवत, नाचत अनोखे स्वागत केले.

यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, इतके मोठे कुटूंब बरोबर घेऊन जात असताना थोडा फार त्रास होत असतो. पण थेट देवाच्या दारात जाऊन व्हीआयपी दर्शन घेतले तर देव कधी पावत नाही. मी आमदार असलो तरी व्हिआयपी दर्शनाचा आग्रह केला तरी लाईनमध्येच दर्शन घेतो. देवापुढे छोटा मोठा कोणीच नसतो. सर्व भाविक सारखेच असतात. माता-भगिनींनी मोहटादेवी यात्रेचा आनंद घ्यावा, यात्रेत फेरफटका मारावा असे सांगतानाच यंदा रस्ता चांगला झाल्याने तुम्ही लवकर घरी पोहचणार आहात. यात्रेतील माता भगिनींच्या दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे ते म्हणाले. युवा नेते जितेश सरडे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, मोहटादेवीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आ. नीलेश लंके यांनी चार दिवस उपोषण केल्यामुळे आता आपण दिड तासात मोहटादेवी येथे पोहचणार आहोत. नीलेश लंके नावाचे कुटूंब गेल्या एक महिन्यापासून या यात्रेचे नियोजन करीत असून माता भगिनींना उन्हापासून त्रास होत असल्याबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त केली.

यावेळी पारनेरचे नगराध्यक्ष नितीन आडसुळ, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, जितेश सरडे,दादा शिंदे, अ‍ॅड. राहुल झावरे, श्रीकांत चौरे ,महेंद्र गायकवाड, आर. आर.राजदेव, संदीप चौधरी, अनिल गंधाक्ते, विजय डोळ, डॉ.आबासाहेब खोडदे, सतीश पिंपरकर, अमित जाधव, माजी उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, डॉ. विद्या कावरे, सुभाष कावरे आदी उपस्थित होते.

▪️कोणीही आव आणून होणार नाही !

आ. नीलेश लंके हे युगपुरूष आहेत. गोरगरीब जनतेची ते आहोरात्र सेवा करीत आहेत. माय माऊलींच्या आशिर्वादातून त्यांना मिळालेल्या उर्जेतून त्यांना हे शक्य होते आहे. ही उर्जा लंके यांच्याकडे आहे. कोणीही आव आणून ते होणार नाही. ही सत्कर्माची दिंडी अशीच अखंडपणे सुरू राहणार असल्याचे अर्जुन भालेकर म्हणाले.

त्याला उर्जा, भाग्य लागते

आज काल काहींना आमदार, खासदारकीची स्वप्नं पडू लागली आहेत. आज, उद्या तयार होतील अणि स्वप्न पाहतील. मात्र ते शक्य नाही. कारण त्याला उर्जा लागते, भाग्य लागते असे सांगत अर्जुन भालेकर यांनी राजकारणातील सद्य स्थितीवर भाष्य केले.

▪️मला महाराज करायचं डोक्यात आहे काय ?

आ लंके हे भाषण करीत असताना एक वृध्दा आ. लंके यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न करीत होती, त्यावर आजी मघापासून पाया पडत आहे, आजीच्या डोक्यात असेल आजून दोन चार माळा घाल आणि जा हिमालयात ! मला महाराज करायचं डोक्यात आहे काय आजी ? असे सांगत आ. लंके यांनी यावेळी मिश्किली केली.

▪️गाणे म्हणण्यासाठी आजीबाईंची चढाओढ

पारनेरच्या क्रीडा संकुलावर आल्यानंतर तिथे माईकवर गाणी म्हणण्यासाठी वयोवृध्द महिलांची चढाओढ लागली होती. कुणी मोहटादेवीचा महिमा गात होते तर कुणी आ. नीलेश लंके यांचे गोडवे गात होते. गाणी म्हणण्यासाठी माईकची अक्षरशः ओढाताण होत होती. अ‍ॅड. राहुल झावरे यांना मध्यस्ती करीत सर्व महिलांना संधी द्यावी लागत होती. गाणी म्हणतानाच काही आजीबाई ठेकाही धरत होत्या.

▪️माता भगिनींचा लोकनेता !

ज्याला स्त्री ही मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा शाम झाला, बहिण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला, आई म्हणून समजली तो जिजाऊंचा शिवबा झाला आणि ज्याला स्त्री सुध्दा एक माणूस आहे हे समजले तो पारनेर नगर तालुक्यातील माता-भगिनींचा लोकनेता झाला असे सांगत जितेश सरडे यांनी आ. लंके हे माता-भगिनींसाठी आयोजित करीत असलेल्या देवदर्शन यात्रेचे समर्थन केले.

▪️पारनेर नगरपंचायतीची चोख व्यवस्था

मोहटादेवीकडे प्रस्थान करण्यासाठी कान्हूर गटातील बसेस पारनेर येथील क्रीडा संकुलावर एकत्र येणार होत्या. नगराध्यक्ष नितीन आडसुळ, अर्जुन भालेकर, डॉ.विद्या कावरे, सुरेखाताई भालेकर , योगेश मते, बाळासाहेब नगरे, सुभाष कावरे ,बंडू गायकवाड , अमित जाधव , रमीज राजे , यांच्यासह इतर नगरसेवकांनी क्रीडा संकुल येथे माता-भगिनींसाठी चोख व्यवस्था ठेवली होती.