आळेफाटा, दि.(मनीष गडगे)जुन्नर तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना आळेफाटा येथे घडली असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याची घटना घडली.याप्रकरणी येथील कॅन्सर रुग्णालयाच्या डॉक्टरवर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली हकीकत अशी,पोलीस प्रशासनामध्ये ठाणे शहर कंट्रोलला सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या निशा महादेव चव्हाण यांचे चुलते ठकसेन उर्फ बाळासाहेब विठ्ठल चव्हाण वय वर्ष ४० वर्ष यांवर डाव्या गालावर गाठ आल्याने,आळेफाटा येथील डॉ अमोल डुंबरे यांच्या आळेफाटा येथील मार्केट यार्ड समोरील सी क्युअर हॉस्पिटलमध्ये दि २७ फेब्रुवारी २१ रोजी उपचार सुरु होते.मात्र उपचारादरम्यान त्यांच्यानाका तोंडातून सतत रक्त येत असल्याचे डॉक्टर अमोल डुंबरे यांना निदान न झाल्याने व ट्रीटमेंट मध्ये अनियमितता व हलगर्जीपणा असल्याने बाळासाहेब चव्हाण यांचा एक मार्च २१ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक निशा चव्हाण यांनी ससून हॉस्पिटल मार्फत चौकशी करण्यासाठीचा अर्ज दाखल केला.ससून रुग्णालयाने सी क्युअर हॉस्पिटलच्या डॉ अमोल डुंबरे यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे बाळासाहेब चव्हाण यांना आपला जीव गमवावा लागल्याबाबतचा अहवाल दिला.
बाळासाहेब चव्हाण यांच्या मृत्यूस डॉ.अमोल डुंबरे यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याने,सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा महादेव चव्हाण यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.याफिर्यादीवरून आळेफाटा पोलिस ठाण्यात डॉ अमोल डुंबरे यांच्यावर भा.द.वि.कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करीत आहे.