बेल्हेच्या बाजारात बैलांची आवक वाढली पण खरेदीला प्रतिसाद कमी,उलाढाल मंदावली

बेल्हे,दि.(प्रतिनिधी)राज्यात प्रसिद्ध असलेल्या बेल्हे आठवडे बैल बाजारात दर सोमवारी मध्य प्रदेश,कर्नाटक, केरळ, गुजरात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून बैल खरेदी- विक्रीसाठी व्यापारी व शेतकरी येतात.मात्र,यंदा पाऊस कमी झाल्यामुळे या बाजारावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सध्या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या बैलांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, खरेदी मंदावली आहे.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बेल्हे येथे गेल्या अनेक वर्षांपासून दहा एकर क्षेत्रामध्ये दर सोमवारी बैलांचा बाजार भरतो. या बाजारामध्ये खिलार, म्हैसूर, गावठी आदी जातीचे बैल विक्रीला येतात. या बैलांच्या किमती ३० हजारांपासून दीड लाखांपर्यंत असतात. शेतकरी आणि व्यापारी आदल्या दिवशी या ठिकाणी बैल विक्रीला घेऊन येतात. जेवणाची व्यवस्था असल्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची चांगली सोय होते. दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा काळ वगळता हा बैल बाजार अखंडपणे दर सोमवारी सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे थोडे दिवस हा बैल बाजार बंद होता.

दर सोमवारी या ठिकाणी बैलांचा बाजार भरतो. या दिवशी तीन ते चार हजार बैल विक्रीला येत असतात.बैलगाडा शर्यती सुरू झाल्यामुळे या बाजाराचे महत्त्व वाढले आहे. येथे मध्य प्रदेश व कर्नाटकसह अन्य राज्यांमधील व्यापारीही बैल खरेदीसाठी येत असतात.

बेल्ह्याच्या बैलबाजारामध्ये खरेदी-विक्रीसाठी बैलांसह म्हशींचीही होते खरेदी-विक्री या बैल बाजारामध्ये बैलांसह नामांकित म्हशीदेखील विक्रीला येत असतात. तसेच बैलगाड्यासाठी लागणारे साहित्यही विक्रीसाठी असते. या बाजारामध्ये खात्रीशीर बैल मिळत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करताना पाहायला मिळतात.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बेल्हे येथील बाजारात येणाऱ्या व्यापारी आणि शेतकऱ्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते. बैल विक्रीमधून व्यापारी किंवा शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याचीही काळजी बाजार समिती घेत असते असे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे,संचालक धोंडिभाऊ पिंगट यांनी सांगितले.