आळेफाटा येथील गोल्डन बेकरीत खाद्यपदार्थात जिवंत अळ्या:अन्न व औषध प्रशासनाने केला बेकरीचा परवाना रद्द

आळेफाटा, दि.(मनीष गडगे)आळेफाटा येथे अंदाजे गेल्या ३५ वर्षांपासून सुरु असलेल्या गोल्डन बेकरीतील बेकरी पदार्थांमध्ये जिवंत अळ्या आढळून आल्याने परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

याप्रकाराची अन्न भेसळ-औषध प्रशासन विभागाने चौकशी करून ही बेकरी तात्काळ बंद करण्यात यावी,तसेच बेकरी मालकावर तात्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

याबाबत मुख्य तक्रारदार संदेश काशिकेदार व नवनाथ चासकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.५ ऑक्टोबर रोजी गोल्डन बेकरी येथे रोट विकत घेतले असता त्यात जिवंत अळ्या आढळून आल्याने सदरची बाब गोल्डन बेकरी चालकाच्या लक्षात आणून दिली असता त्याने अरेरावी व शिवीगाळ करत तक्रारदार यांना हाकलवून दिले. त्यानंतर तक्रारदार यांनी आळेफाटा पोलिसांशी संपर्क साधला असता सदरचा गुन्हा अन्न व भेसळ कार्यालयच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले.

त्यांनतर अन्न व औषध प्रशासन अधिकारी राहुल खंडागळे यांनीही आपल्या कर्तव्यात कसूर करत बेकरी मालकाला पाठीशी घातले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र आळे येथे आरोग्य निरीक्षक रोहिदास मुंजाळ यांना लेखी तक्रार केली असता आरोग्य निरीक्षक रोहिदास मुंजाळ यांनी सदर रोट खाद्य पदार्थाचे नमुने सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठविले असता दि १२ ऑक्टोबर रोजी रोट मध्ये मृत अळ्या आढळ्याचा अहवाल देत सदर खाद्य पदार्थ मानवी आरोग्यास खाण्यास हानिकारक अपायकारक असल्याचा अहवाल दिला.त्यानुसार तक्रारदार संदेश काशिकेदार, नवनाथ चासकर, नवनाथ वाळुंज यांनी बेकरी परवाना रद्द करून बेकरीला कायमस्वरूपी सील लागणेबाबत अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांच्याकडे तक्रार केली.

आयुक्त ए एस गवते यांनी उपलब्ध तक्रार अर्ज व प्रयोग शाळा अहवालयाची खातरजमा करत दि २४ नोव्हेंबर रोजी गोल्डन बेकरीचा परवाना रद्द करत असलेबाबतचा आदेश काढला.

मात्र आदेश येऊनही आळेफाटा येथील गोल्डन बेकरी राजरोस सुरु असून मानवी आरोग्यास हानिकारक गोष्टींचा अद्यापही सर्रास विक्री सुरु असल्याबाबत अन्न व औषध प्रशासन आयुक्त ए एस गवते ह्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी २४ डिसेंबर रोजी बेकरीला टाळे मारणार असल्याचे सांगितले.

याबाबत जर  बेकरी परवाना रद्द केला आहे तर मग इतर पदार्थ विक्रीसाठी एक महिन्याची मुदतवाढ का? अन्न आणि औषध प्रशासन २४ डिसेंबर रोजी या बेकरीला टाळा ठोकणार का? सुरु असलेली गोल्डन बेकरी भविष्यातही सुरु राहणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी आळेफाटा येथील बिकानेर बेकरीतही केकमध्ये अळ्या आढळून आल्या होत्या मात्र या बाबत संबंधित बेकरी चालकाने अन्न भेसळ व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कसे थांबविले याची रंगतदार चर्चा परिसरात प्रत्येक गावात रंगत आहे.

आळेफाटा येथील गोल्डन बेकरीबाबतही अन्न भेसळ आणि औषध प्रशासनाकडून असा प्रकार घडणार असल्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.