बेल्हे, दि.(प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा तसेच ज्या दरामुळे सरकार ही जेरीस येते असे कांदा पीक मात्र महिला शेतमजुरांसाठी वर्षभर रोजगार उपलब्ध करून देत आहे. यामुळे ते महिला शेतमजुरांना वरदान ठरत आहे. सध्या त्यांना सहाशे ते सातशे रुपये प्रतिदिन मजुरी मिळते.
कांदा पिकाची रोप तयार करतानाही रोप निदनीसाठी महिला शेतमजुराला मागणी असते. तसेच कांद्याची लागवड करताना कांदा रोप उपटून शेतात लागवड करण्यासाठी महिला शेतमजुरांना मागणी असते. त्यात कांदे लागवडी कांदे लागवड करणाऱ्या महिलांना दिवसाला सहाशे ते सातशे रुपये मजुरी दिली जाते. म्हणजेच सर्वसाधारणपणे पुरुष शेतमजुराला पाचशे ते सहाशे रुपये दिवसाची शेतमजुरी असते.
कांद्यामुळे पुरुष शेतमजुरांपेक्षा महिला शेतमजुरांना जास्त दराने मजुरी मिळते. कारण कांदा लागवडीमध्ये महिला शेतमजुरांना पुरुष शेतमजुरांपेक्षा जास्त मजुरी मिळवून देते. कांदा पिकामुळे कधी शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू फुलते तर कधी डोळ्यात पाणी येते.
कांदे लागवडीनंतर कांदे खुरपणी व कांदे काढणी या दोन्ही कामासाठी महिलांनाच प्राधान्य दिले जाते. कांदे काढून झाल्यावर बाजारात विकण्यासाठी निवड करून कांदे गोण्यांमध्ये भरण्यासाठी महिला मजुरालाच मागणी असते. कांदे चाळीत साठवणूक करतात त्या शेतकऱ्यांकडून काढलेले कांदे निवडून चाळीत साठवणूक करण्यासाठी महिलेलाच प्राधान्य दिले जाते.
जुन्नर तालुक्यात सरासरी अंदाजे आठ ते नऊ हजार हेक्टर वर दर वर्षी कांदा पीक घेतले त्यातील सर्वात जास्त कांदा बेल्हे आणि ओतूर कृषी मंडलधिकारी कार्यालयातंर्गत असलेल्या गावांत शेतकरी पिकवतात.