आळेफाटा(प्रतिनिधी)आळेफाटा येथे खाद्य तेलाचे गोडाऊन फोडून दोन लाख १७ हजार रुपये किमतीचे तेलाचे डबे लंपास करणाऱ्या दोघाना पकडण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले.
आळेफाटा येथे ४ संप्टेंबर २३ रोजी येथील विठ्ठल रामचंद्र बेल्हेकर यांच्या वडगाव आनंद गावात असलेल्या तेलाचे गोडाऊनमधून २ लाख१७ हजार ७६६किमतीचे तेलाचे डबे,तेलाचे पाकीटे,बॉक्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा गुन्हा दाखल होता.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर,पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलिस पथकाने सी.सी.टी व्ही फुटेजमधील आरोपीची माहिती मिळवली.
अशुतोष सुरेश बेल्हेकर(रा बेल्हेकरपट,पो.काळवाडी ता. जुन्नर),अशोक रामकृष्ण काचळे(रा.काचळेमळा, भटकळवाडी,पो.पिंपळवंडी,ता.जुन्नर)या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपीकडून त्यांनी गुन्हयात वापरलेल्या मोटार सायकली तसेच तेलाचे डबे व पुड्यांची विक्री करून मिळवलेली एक लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले.