वयोवृद्ध ना लुटणारा भामटा पोलिसांच्या ताब्यात

आळेफाटा(प्रतिनिधी)वयोवृद्ध व्यक्तींना घरातील व्यक्तींची ओळख असल्याचे भासवून लुटणाऱ्या भामट्याला पकडण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले.

पिंपळवंडी गावच्या हद्दीत बाम्हणेमळयातील ओंकार भास्कर बाम्हणे यांचे आजोबा घरी एकटे असताना,अज्ञात व्यक्तीने घरी येवून तुमच्या मुलाची व माझी ओळख असल्याचा फार्स रंगवत घरात घुसून घरातील सोन्याचे दागिने लंपास केले.बेल्हे गावच्या शिंदेमळ्यातील निलेश शिंदे यांच्या घरीही अशाच प्रकारचा फार्स रंगवत लूट केली होती.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर,पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलिस पथकाने सी.सी.टी व्ही फुटेजमधील आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत याचा बारकाईने अभ्यास करून आरोपी यांची माहिती मिळवली.

संशयित आरोपी म्हणून संदिप साहेबराव रायते(रा. खडकमाळवाडी,ता.निफाड जि.नाशिक)याला ताब्यात घेतले,त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले.या आरोपींवर विविध पोलिस ठाण्यात पन्नासहून  अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिस निरीक्षक होडगर यांनी सांगितले.