बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

बेल्हे(प्रतिनिधी)मक्याच्या शेतात दबा धरलेल्या बिबट्याने, पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यावर झडप घातली.मोठ्या शिताफीने शेतकऱ्याने प्रतिकार करत बिबट्याला पळवून लावले.बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला ग्रामस्थांनी रुग्णालयात उपचार दाखल केले. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान आणे(ता.जुन्नर )शिवारात नळावणे रस्त्यावर घडली.

आणे(ता.जुन्नर)येथील किरण तुळशीराम दाते(वय ३५)हा तरुण शेतकरी त्याच्या नळावणे रस्त्यावर असलेल्या मक्याच्या पिकाला पाणी भरत होता.दुपारी एकच्या सुमारास मक्याच्या पिकात दबा धरलेल्या बिबट्याने सावज बनविण्यासाठी किरण दाते यांच्यावर झडप घातली.क्षणाचाही विलंब न करता,त्यांनी प्रतिकार करत बिबट्याला पळून लावले.तद्नंतर मदतीसाठी आरडा-ओरडा केला.जवळच शेतात काम करत असलेले शेतकरी मदतीला धावले.सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते यांनी  जखमी किरणला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

पण बिबट्याच्या हल्ल्याच्या रुपाने समोर काळ उभा राहिलेला पाहून त्या धक्क्यातून किरण दाते अजून सावरलेल्या नाहीत,असे त्यांच्या कुटुंबायांनी सांगितले.