बेल्हे(सुरेशभुजबळ):पेमदरा(ता.जुन्नर,जि.पुणे)येथील गट क्रमांक ३४० मधील ६००० चौ.मी. क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या Cultural Hall & Exhibition Cum Convention Center या प्रकल्पाच्या बांधकामास तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पासाठी पुणे येथील नगर रचना मूल्यनिर्धारण विभागामार्फत २४ डिसेंबर २०२४ रोजी तसेच नंतर १० जानेवारी २०२५ रोजी अधिकृत परवानगी देण्यात आली होती. तथापि, ग्रामस्थांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात या प्रकल्प कागदपत्रांची चौकशी करावी अशी मागणी केली होती.
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत, संबंधित विभागाने सध्या सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून, स्थानिक प्रशासनाकडून अधिक चौकशी आणि सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रकल्पाचे समर्थक या विकासकामास न्याय देण्यासाठी पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहेत.