नारायणगाव येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक; १०किलो२७५ ग्रॅम गांजासह १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त 

नारायणगाव(प्रतिनिधी)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नारायणगाव येथे मोठी कारवाई करत, गांजा विक्रीसाठी आलेल्या इसमास अटक केली असून त्याच्याकडून  १० किलो २७५ ग्रॅम गांजा आणि मोटारसायकलसह १लाख ३२हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ. दिपक साबळे, पोहवा संदीप वारे, पोहवा अक्षय नवले यांनी जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे केली.

गोपनीय माहितीप्रमाणे, इसम मुनवर अली सय्यद (वय ४८, रा. कोतुळ, ता. अकोले, जि. अहमदनगर) हा नारायणगाव-मांजरवाडी रोडवर गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.

झडती दरम्यान, त्याच्या मोटारसायकलच्या मागील सायडीत पोत्यामध्ये १०.२७५ किलो गांजा आढळून आला. त्याच्याकडून गांजा व मोटारसायकल असा एकूण १,३२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अविनाश शिळीमकर(वरिष्ठ पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा)स.पो.नि. महादेव शेलार,स.फौ. दिपक साबळे,संदीप वारे,अक्षय नवले,राजू मोमीन,सोमशेखर शेटे, दडस पाटील,मंगेश लोखंडे,सोमनाथ डोके,सत्यम केळकर या पथकाने कारवाई केली.