वडिलांचं छत्र हरपलं… शिक्षण अडकलं… पण गावाच्या मायेने वाट सापडली!

बेल्हे(प्रतिनिधी)बेल्हे येथील रामचंद्र औटी यांच्या निधनानंतर त्यांच्या तिघा लेकरांच्या डोळ्यांत अश्रू,मनात काळजी होती. पण त्या संकटात एक आशेचा किरण ठरला,बेल्हे गावाचा एकजुटीचा हात!

अंत्यविधीच्या दिवशीच औटी कुटुंबातील किर्तीचं नाव MBA च्या पहिल्या राऊंडमध्ये चौथ्या क्रमांकावर आलं. पण परिस्थिती अशी की शिक्षण घेणं कठीण होतं. मोठी बहीण हर्षदा ही सीए एंटर पास असून फायनल बाकी आहे, लहान भाऊ मयूर हॉटेल मॅनेजमेंट करत होता – पण फी नसल्याने अभ्यास थांबला होता.

पण… इथंच सुरू झाली एक दैवी धावपळ!

राजेंद्र गाडगे,बबूशा पिंगट,किसन देशमुख,निलेश औटी, तान्हाजी औटी,जयराम मटाले,डॉ.किरण पिंगट अशा अनेकांनी एकत्र येऊन ठरवलं”ही लेकरं शिकलीच पाहिजेत!” गावातील रामदास ऊर्फ आप्पासाहेब गाडगेंनी पहिलं दान दिलं ११,००० रुपयांचं.आणि सुरू झाला “शिक्षणासाठी साखळी उपक्रम”!

कुणी रोख रक्कम दिली, कुणी स्कॉलरशिप, कुणी होस्टेलसाठी मदत केली. विजय शेठ घोडके यांनी तर बँकेकडून शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी स्वतः जबाबदारी घेतली!

या उपक्रमात अनेकांनी गुप्त मदत केली. कुणी हजार दिले, कुणी लाख. पण प्रत्येकाच्या मनात एकच भावना – “या लेकरांचं शिक्षण थांबू नये!”गाव माणूसकीने उभा राहिला आणि तीन जिवांना नवी दिशा दिली.

आज हर्षदा, किर्ती आणि मयूर यांचं शिक्षण सुरू आहे. आत्मविश्वासाने ते पुढे वाटचाल करतायत. आणि त्यांचं एकच वचन”आम्ही पुढे गेलो, तर अशाच गरजूंसाठी हात पुढे करू.”शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि बेल्हे गावाने ती वाघिणं घडवायला हातभार लावला!”