मंगरूळ:-समाजातील युवकांमध्ये वकृत्व कौशल्य विकसित करून राजकीय, साहित्यिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत सक्षम व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘स्वप्नवेध भाषण शिका क्लासेस’च्या नवीन शाखेचे उद्घाटन अतिरिक्त जमाबंदी आयुक्त तथा भारत सरकारच्या भूमी अभिलेख विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
विशेष म्हणजे, या क्लासेसमधून मिळणारे मानधन मंगरूळ येथील स्वप्नवेध अनाथालयातील निराधार मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी वापरले जाते. त्यामुळे या उपक्रमाला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून स्वप्नवेधने आजपर्यंत राज्यभरात ४३ शाखा उभारून हजारो वक्ते विचारपीठावर उभे करण्याचे कार्य केले आहे.
यावेळी ह.भ.प. हौसीराम महाराज विश्वासराव, कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, भानुदास खराडे, लोकनियुक्त सरपंच मनीषा खिलारी, माजी लोकनियुक्त सरपंच ताराताई लामखडे, ग्रामसेवक प्रवीण खराडे, अशोक खिलारी, धोंडाबाई गोसावी, विठाबाई औटी, दादाभाऊ लामखडे, नारायण खुटाळ, चंद्रकांत ढगे, प्रभाकर नायकोडी, भाऊसाहेब घोलप, डॉ. आकाश भोजने, भरत भोजने, चंद्रशेखर भोजने, सूर्यकांत भोजने, दत्ता बारेकर, रोहित बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर खिलारी म्हणाले, “आजच्या स्पर्धेच्या युगात युवकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी वकृत्व कौशल्य आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. सचिन भोजने यांनी सुरू केलेला हा उपक्रम समाजोपयोगी असून अनाथ व निराधार मुलांचे संगोपन करत असताना अशा प्रकारचे कार्य उभे राहणे गावासाठी अभिमानास्पद आहे. भविष्यात शालेय विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाचा लाभ मिळावा. त्यासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो.”
या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक विषयांचे ज्ञान मिळेल तसेच त्यांच्यात प्रभावी वकृत्व विकसित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी ग्रामसेवक प्रवीण खराडे, लोकनियुक्त सरपंच मनीषा खिलारी यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नारायण खुटाळ यांनी केले.
संस्थापक सचिन भोजने यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “निराधार व अनाथ मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असते. स्वप्नवेध भाषण शिका क्लासेसच्या माध्यमातून मिळणारा निधी त्यांच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी उपयोगात आणला जात आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ वकृत्व प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपणारी चळवळ ठरत आहे.”
या उपक्रमाचे मंगरूळसह संपूर्ण पंचक्रोशीतून कौतुक होत असून सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या प्रयत्नाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.