बेल्हे(प्रतिनिधी) : बेल्हे स्मशानभूमी परिसरातील रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी काही दिवसांपूर्वी भूमिपूजनाचा धुमधडाका झाला.मोठमोठ्या घोषणांमधून”रस्ता बनणार” असा गाजावाजा केला गेला.पण,प्रत्यक्षात रस्ता न करताच “रस्ता बनला” असा फलक लावून श्रेय लाटण्याचा आगळावेगळा प्रकार समोर आला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, बेल्हे-राजुरी जिल्हा परिषद गटात आपल्या बायकोसाठी उमेदवारीची तयारी करणाऱ्या एका कार्यकर्त्याने हा “फलकप्रपंच” रचल्याची चर्चा रंगली आहे.शुक्रवारी दुपारी अंत्यविधीसाठी स्मशान भूमीत आलेल्या नागरिकांच्या नजरेस हा फलक पडला, पण रस्ता मात्र गायब! परिणामी,परिसरात चांगलीच कुजबुज सुरू झाली.
दरम्यान,ही बाब एका जागृत कार्यकर्त्याच्या लक्षात आली आणि त्याने तत्काळ फलक हलवण्याचे आदेश देत तो काढून टाकला.यानंतर या “कागदी रस्त्याच्या” प्रकरणावर बेल्हे-राजुरी गटात उलटसुलट चर्चा रंगली आहे.