शिंदे गावचे सुपुत्र उद्योजक बाळासाहेब खिलारी यांची वडगाव आनंद शाळेला प्रेरणादायी भेट

विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, उद्योजकतेचे मार्गदर्शन; लवकरच संगणक वाटपाची घोषणाही

वडगांव आनंद : मौजे शिंदे गावचे सुपुत्र आणि मुंबई नगरीत व्यापार क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण करणारे उद्योजक आदरणीय श्री बाळासाहेब खिलारी यांनी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव आनंद येथे सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या ‘नवे नवे तर’ या खाद्यपदार्थ व्यवसायाचे संस्थापक म्हणून त्यांची ख्याती सर्वत्र आहे.

भेटीदरम्यान खिलारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना खाऊ वाटप करून आनंदाचा क्षण अधिक संस्मरणीय केला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी मुलांना “मेहनत करा, चांगला अभ्यास करा, अधिकारी व्हा किंवा उद्योजक व्हा—जीवनात उंच भरारी घ्या” असा प्रेरणादायी संदेश दिला.

डिसेंट फाउंडेशन, जुन्नर या सेवाभावी संस्थेचे संचालक म्हणून खिलारी सामाजिक उपक्रमांमध्येही सातत्याने योगदान देत आहेत. त्याच अनुषंगाने, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगणक देण्याचा महत्त्वाचा मनोदय त्यांनी व्यक्त केला असून, फाउंडेशनच्या माध्यमातून लवकरच शाळेला संगणक देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला मोठा हातभार मिळणार आहे.

कार्यक्रमादरम्यान शाळेचे शिक्षणतज्ञ सदस्य श्री डी. बी. वाळुंज यांनी शाळेच्या वतीने खिलारी यांचे आभार मानले तसेच भविष्यात अशाच भेटींचे नियोजन व्हावे अशी विनंती केली.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील टिकेकर, अध्यक्ष श्री दत्तात्रेय चौगुले पाटील, सहशिक्षिका छाया डुंबरे, सुनंदा तांबे, सविता खेत्री, गीतांजली बोऱ्हाडे-वाळुंज तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहात उपस्थित होते.