पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वकील क्रिकेट स्पर्धेत जुन्नर वकील बार असोसिएशनच्या संघाने चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. दमदार फलंदाजी, काटेकोर गोलंदाजी आणि शिस्तबद्ध क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जुन्नर संघाने संपूर्ण स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.
जुन्नर संघाचे नेतृत्व कर्णधार ऍड. गणेश अल्हाट यांनी रणनीतीपूर्ण पद्धतीने सांभाळले, तर उपकर्णधार ऍड. सिद्धेश वाघोले यांनी संघबांधणी आणि महत्त्वाच्या क्षणी प्रभावी खेळ करीत संघाच्या यशात मोलाची भर घातली.
या उल्लेखनीय विजयानंतर जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी विजेत्या संघातील सर्व खेळाडूंचा सत्कार करून गौरव केला. खेळाडूंना शाल-श्रीफळ देत बेनके यांनी त्यांच्या संघभावना, जिद्द आणि उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले.
या सत्कारामुळे खेळाडूंत उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
जुन्नर वकील बार असोसिएशनच्या या भक्कम कामगिरीचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत असून, या विजयाने जुन्नरचा क्रीडा व कायदेक्षेत्रातील लौकिक आणखी वृद्धिंगत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.