बेल्हे;बेल्हे–शिरूर या महामार्गाचे उद्घाटन होण्यापूर्वीच रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य सुरू झाले आहे. काही ठिकाणी अद्याप काम सुरू असतानाच बेल्हे भागातील मोठ्या खड्ड्यांमुळे सलग अपघातांची मालिका पाहायला मिळत होती. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि संबंधित ठेकेदाराला वारंवार विनंत्या करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
मात्र, या सर्व निष्क्रियतेतून बेल्हे येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खरा समाजधडा शिकवत पुढाकार घेतला आणि स्वतःहून रस्त्यावरील खड्डा बुजवण्याचं काम हाती घेतलं. छोट्या हातांनी मोठं काम करत विद्यार्थ्यांनी अपघातांना थातुर मातूर का होईना तात्पुरता अडथळा आणला.
विद्यार्थ्यांनी केलेल्या या प्रयत्नाचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी कायमस्वरूपी दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोण घेणार?सार्वजनिक बांधकाम विभाग आता तरी जागे होणार का?की पुन्हा एखादा अपघात झाल्यावरच हालचाल सुरू होणार?हा प्रश्न नागरिकांमध्ये अनुत्तरीतच आहे.