मोटारसायकल चोरट्याला बेड्या; चार दुचाकी व मोबाईल जप्त

जुन्नर:-जुन्नर व आंबेगाव तालुक्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असून, सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली व एक मोबाईल असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मंचर, घोडेगाव, नारायणगाव आणि ओतूर परिसरात अलीकडे मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू करून विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपासादरम्यान सर्व घटनांमध्ये एकच संशयित दिसून आल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, पोलिस अंमलदार अक्षय नवले यांना गोपनीय माहिती मिळाली की, सीसीटीव्हीमध्ये दिसणारा संशयित हा मंचर येथील राहुल अशोक दाते (वय २५) असून, तो चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी घोडेगाव-नारोडी फाटा येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व घोडेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने घोडेगाव, मंचर, नारायणगाव व ओतूर येथून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चार मोटारसायकली तसेच नारायणगाव येथून चोरीस गेलेला एक मोबाईल जप्त करण्यात आला. याप्रकरणी घोडेगाव, मंचर, नारायणगाव व ओतूर पोलीस ठाण्यातील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपीला पुढील तपासासाठी घोडेगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
कारवाईत सपोनि. महादेव शेलार, सपोनि. सागर पवार (घोडेगाव), सहायक फौजदार दीपक साबळे, पोहवा संदीप वारे, राजू मोमिन, पोशी अक्षय नवले यांच्यासह घोडेगाव पोलीस ठाण्याचे महेश पवार, अमरदीप वंजारी, विठ्ठल वाघ, नीलेश तळपे, सावंत, कांबळे, पो.कॉ. तनपुरे, लगड, वायदंडे तसेच नारायणगाव पोलीस ठाण्याचे मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, टीलेश जाधव यांनी सहभाग घेतला.