बेल्हे:-आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश जनावरांची अमानुष व बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आली असून या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे.परिसरात“गोरक्षक”म्हणून ओळख असलेला बेल्ह्यातील सुरज शिरतर हा या संपूर्ण रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मौजे बेल्हे(ता.जुन्नर)येथील हॉटेल सावली समोर कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर पोलिसांनी कारवाई केली.यावेळी आयशर व अशोक लेलंड कंपनीच्या दोस्त प्लस(एम.एच.२१,बी.एच.७१३०)वाहनातून गोवंश जनावरे दाटीवाटीने,कोणतीही चारापाणी व्यवस्था न करता, दोऱ्यांनी बांधून क्रूरतेने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी शिवराज विश्वनाथ संगनाळे (वय ३०, रा. गोळेगाव,ता.जुन्नर)यांनी फिर्याद दिली असून, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा१९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात हवाजी(हबाजी),श्रावण ठोंबरे(जि.बीड), भगवान बबन शिंदे(छ.संभाजीनगर),करण भिमराव यादव (जि.जालना),अजिम नसिर बेपारी (रा.बेल्हे,ता.जुन्नर), गोरक्षक सुरज शिरतर (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ गोवंश जनावरे(७५ हजार रुपये अंदाजे किंमत),अशोक लेलंड दोस्त प्लस वाहन(तीन लाख रुपये अंदाजे किंमत)असा सुमारे तीन लाख ७५हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास गोसावी हे पुढील तपास करत आहेत.या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार व संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे,परिसरात “गोरक्षक” म्हणून ओळख असलेला बेल्ह्यातील सुरज शिरतर हा जनावरांची बेकायदेशीर वाहतूक सुलभ करून देत असल्याचा संशय आहे.जनावरे कत्तलीसाठी बाहेर पाठवण्यासाठी मार्गदर्शन करणे,तसेच त्यातून आर्थिक व्यवहार(“हप्ते”)होत असल्याच्या चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहेत.
काही आरोपींवर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने ही केवळ एक स्वतंत्र घटना नसून मोठ्या रॅकेटचा भाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.