नारायणगाव:-पुणे ग्रामीण जिल्ह्यात बेकायदेशीर अग्नीशस्त्रांवर कारवाई करताना स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव परिसरात सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे (पिस्टल), दोन जिवंत काडतुसे तसेच वाहन असा एकूण ५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारफाटा (निमगाव सावा) परिसरात आरोपी राहुल सुरेश साळवे (रा. साकोरी तर्फे बेल्हे, ता. जुन्नर) हा त्याच्या साथीदारांसह अवैधरित्या शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून राहुल साळवे, दर्पण सुरेश पवार (वय २२, रा. नारायणगाव) व तेजस संदीप मातेले (वय २१, रा. नारायणगाव) यांना ताब्यात घेतले.
अंगझडतीदरम्यान राहुल साळवे व तेजस मातेले यांच्या कमरेला खोसलेले दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. महादेव शेलार, स.पो.नि. प्रवीण सपांगे, स.फौ. दिपक साबळे, पो.हवा. संदीप वारे व पो.हवा. अक्षय नवले यांच्या पथकाने केली.