जुन्नर:-जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे दुपारच्या सुमारास घरात एकट्या असलेल्या वयोवृद्ध महिलेवर हल्ला करून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी कल्पना बाजीराव राजगुरू (वय ६२, रा. सावरगाव, ता. जुन्नर) या दुपारच्या वेळी घरी एकट्याच असताना एका अज्ञात इसमाने घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले तसेच त्यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ११०/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी तातडीने तपास करून आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.
तपासादरम्यान सावरगाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एक संशयित इसम मोटारसायकलवरून जाताना दिसून आला. पुढे नारायणगावच्या दिशेने जाताना आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी कपडे बदलल्याचेही उघड झाले. आरोपीने वारंवार रस्ता आणि वेश बदलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा मागोवा घेत भोसरीपर्यंत सीसीटीव्ही फुटेज मिळवले.
गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्यात आली. तो रवींद्र गणपत राजगुरू (वय ५४, सध्या रा. अक्षय नगर, भोसरी, पिंपरी-चिंचवड; मूळ रा. सावरगाव, ता. जुन्नर) असल्याचे निष्पन्न झाले.
दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी हा संशयित घोडेगाव फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वृद्ध महिला घरी एकट्या असल्याचे पाहून त्याने हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला जुन्नर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले तसेच पोलीस शिपाई अभिमन्यू मोटे यांनी पार पाडली.