पेमदारा ग्रामपंचायतीत पाणीटंचाईवर आढावा; स्वतंत्र डीपी व बोअरवेलची मागणी

बेल्हे : तालुक्यातील पेमदारा ग्रामपंचायतीत वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी गावभेट देत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत तातडीने उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.

या पाहणी दौर्‍यात पंचायत समिती सभापती कमलताई शेळकंदे,उपसभापती अमित ढोले सदस्य शांताराम दाते,राजेंद्र पिंगट तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायतीतर्फे सरपंच जयश्री गाडेकर,उपसरपंच बाळासाहेब दाते,पाटीलबा गाडेकर,शैलाताई बेलकर, आनंदा बेलकर आदींनी गावातील पाणीपुरवठ्याच्या अडचणी मांडल्या.

ग्रामस्थांनी सध्याच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देत स्वतंत्र वीज वितरण केंद्र (डीपी) उपलब्ध करून देण्याची मागणी केली.तसेच टंचाईवर मात करण्यासाठी नव्या बोअरवेलची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

पदाधिकाऱ्यांनी परिसरातील पाणी साठवण टाक्यांची पाहणी करत पुरवठा यंत्रणेची माहिती घेतली.यावेळी पाणीटंचाई हा संवेदनशील प्रश्न असून, प्रशासनाच्या समन्वयातून लवकरात लवकर तो मार्गी लावला जाईल, असे आश्वासन सभापती शेळकंदे यांनी दिले.पंचायत समिती सदस्य शांताराम दाते यांनीही आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.