कोट्यवधींची उलाढाल…पण सुविधांचा बोजवारा! आळेफाटा उपबाजार शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा

आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचे कृषी केंद्र म्हणून ओळख असलेल्या आळेफाटा उपबाजारात दररोज मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि व्यापाऱ्यांची वर्दळ असते.कांदा, आणि डाळिंब या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असली, तरी बाजारातील मूलभूत सुविधांचा अभाव दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

उपबाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी,स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसणे,पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य आणि उन्हाळ्यात सावलीसाठी निवाऱ्याचा अभाव अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

विशेष म्हणजे, लाखो रुपयांची बाजारातील उलाढाल होत असतानाही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.पहाटेपासून बाजारात दाखल होणाऱ्या शेतकऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते.मात्र बसण्याची,विश्रांतीची किंवा पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.

चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्यास बाजारात अधिक शेतकरी येतील आणि व्यवहारही वाढतील.त्यामुळे बाजार समिती आणि संबंधित प्रशासनाने उपबाजारातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत,अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आळेफाटा उपबाजार हा परिसरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक केंद्रबिंदू आहे.त्यामुळे “व्यवहार मोठा… पण सुविधा शून्य” अशी परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.