“कर आकारला जातो, पण सुविधा कुठे? आळेफाटा गुरांच्या बाजारात शेतकऱ्यांचा संताप”

आळेफाटा:-पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या आळेफाटा गुरांच्या बाजारात दर गुरुवारी शेकडो गाई-बैलांची खरेदी-विक्री होते. मात्र बाजारात व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतानाही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

बाजारात खरेदी किंवा विक्रीसाठी दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवासाची कोणतीही व्यवस्था नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. दिवसभर बाजारात थांबावे लागते, मात्र विश्रांतीसाठी जागा नाही. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने अनेकांना हॉटेलमधील पाणी पिऊन तहान भागवावी लागते, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

तसेच जनावरांसाठी आवश्यक सुविधा, स्वच्छता, सावली आणि इतर मूलभूत सोयींचाही अभाव असल्याचे शेतकरी सांगतात. बाजार समितीकडून कर आणि विविध शुल्क आकारले जात असले, तरी त्या बदल्यात अपेक्षित सुविधा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे.

“आम्ही अनेक किलोमीटरचा प्रवास करून बाजारात येतो. दिवसभर बाजारात थांबावे लागते. पण बसण्याची, राहण्याची किंवा स्वच्छ पाण्याचीही व्यवस्था नाही. शुल्क मात्र नियमित घेतले जाते. बाजार समितीने तातडीने मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,” अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.

दरम्यान, या संदर्भात बाजार समितीची अधिकृत भूमिका अद्याप मिळालेली नाही. त्यांची बाजू मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.