बेल्हे :- विद्यार्थ्यांना संघराज्यात्मक लोकशाही पद्धतीची ओळख व्हावी, त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित व्हावे, विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हावी, मतदान प्रक्रिया नक्की कशी चालते हे विद्यार्थ्यांना लक्षात यावे या उद्देशांसाठी श्री बेल्हेश्वर विद्यालयात विद्यार्थी संसद स्थापन करण्याकरता अभिरूप मतदान घेण्यात आले, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांनी दिली.
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आणि समाजशास्त्र विभाग प्रमुख सदानंद भावारी यांनी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. विद्यालयाचे अनिवासी गुरुकुल प्रकल्प प्रमुख चंद्रकांत हगवणे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून भूमिका बजावली. सांस्कृतिक विभाग प्रमुख विठ्ठल पांडे यांनी निवडणुक कार्यक्रम प्रक्रियेचे सनियंत्रण केले.
विद्यार्थी संसद निवडणुकीतील ८ पदांसाठी एकूण २४ उमेदवार उभे होते. उमेदवारांनी वर्गावर्गात जाऊन प्रचाराद्वारे मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचवली. वर्गशिक्षकांनी वर्गात वर्ग मंत्रिमंडळातील मंत्रीपदावर निवडलेले ८ मंत्री हे विद्यार्थी संसद निवडणुकीसाठी मतदार होते. १४४ मतदारांपैकी १३१ मतदारांनी ईव्हीएम मशीनवर मतदानाचा हक्क बजावला. शालेय मंत्रिमंडळ अभिरूप मतदानात सरासरी ९० % मतदान झाले. संपूर्ण मतदान प्रक्रिया ही शांततेत, निःपक्षपातीपणे व पारदर्शक पद्धतीने पार पडली.
विद्यालयाचे ज्येष्ठ व अनुभवी शिक्षक प्रशांत पादीर यांनी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले, तर तंत्रस्नेही शिक्षक पांडुरंग पोटे यांनी संपूर्ण मतदानाची तांत्रिक बाजू हाताळली. उपशिक्षिका द्रौपदा धराडे यांनी मतदान अधिकारी क्रमांक एक म्हणून विद्यार्थ्यांची ओळख पटवली, तर उपशिक्षिका शितल कलंत्रे यांनी मतदान अधिकारी क्रमांक दोन म्हणून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया समजावून सांगितली.
विद्यालयातील हरहुन्नरी शिक्षिका आरती बोरकर, बालीका नेटारे, रुक्सार शेख यांनी काढलेल्या आकर्षक रांगोळीने मतदार विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यालयाचे जेष्ठ कलाशिक्षक प्रताप चिंतामणी यांनी सुरेख फलक लेखन केले. विद्यालयाचे उपशिक्षक गोपाल फंगाळ यांनी मतदार विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांचे छायाचित्रण केले.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. विजयी उमेदवारांना विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ व पर्यवेक्षक दत्तात्रय खोरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.