शेतकऱ्यांच्या विरोधाची दखल घेत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नारायणगाव:-जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विरोधाची दखल घेत प्रस्तावित लातूर-कल्याण जनकल्याण महामार्गाच्या आरेखनाचा फेरविचार करावा, अशी मागणी खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी केली आहे.या महामार्गाऐवजी कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण तसेच नगर-कल्याण रेल्वेमार्गाच्या विकासाला प्राधान्य द्यावे,अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
रोहोकडी ते तळेरान दरम्यानच्या गावांतील अनेक ग्रामस्थांची उपजीविका प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. प्रस्तावित जनकल्याण महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे शेतजमिनी बाधित होण्याची शक्यता असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
शेतकऱ्यांच्या या भूमिकेची दखल घेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून प्रस्तावित महामार्गाच्या आरेखनाचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. विकासाच्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
लातूर-कल्याण जनकल्याण महामार्गाऐवजी कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केल्यास विद्यमान रस्ते पायाभूत सुविधांचा अधिक प्रभावी वापर करता येऊ शकतो. त्याचबरोबर नगर-कल्याण रेल्वेमार्ग विकसित करण्याला प्राधान्य दिल्यास या भागातील वाहतूक व्यवस्था आणि दळणवळणालाही मोठी चालना मिळू शकते,असे डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.
रस्ते आणि रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास करताना ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचे हितही जपणे आवश्यक आहे,अशी भूमिका खासदार डॉ.कोल्हे यांनी व्यक्त केली.शेती ही या भागातील नागरिकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याने शेतजमिनींचे संरक्षण करत विकासाचा समतोल साधण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.
त्यामुळे प्रस्तावित जनकल्याण महामार्गाच्या आरेखनाचा फेरविचार करून राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि नगर-कल्याण रेल्वेमार्गाचा विकास यांचा पर्याय प्राधान्याने विचारात घ्यावा,अशी मागणी खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.