सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दोघांना एक वर्षाचा कारावास;प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड

आळेफाटा:-पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकारी व अंमलदारांना शिवीगाळ,दमदाटी तसेच धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पिंपरी पेंढार येथील वृषाली विजय कुटे व विजय कोंडीभाऊ कुटे या दोघांना जुन्नर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्षाचा साधा कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

दंडाची रक्कम न भरल्यास आणखी तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.ही शिक्षा २९ सप्टेंबर २०२६ रोजी मा. एस. बी. शेलार, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, जुन्नर यांच्या न्यायालयाने सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास वृषाली कुटे व विजय कुटे हे आळेफाटा पोलीस ठाण्यात आले होते.वृषाली कुटे यांच्या भावाच्या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी प्रतीक शंकर हाडवळे याची पिकअप गाडी पोलिसांनी त्यांच्या परवानगीशिवाय कशी सोडली,असा जाब विचारत त्यांनी पोलिसांशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद होते.

संबंधित आरोपीची गाडी व आरोपी पोलीस ठाण्यात हजर करण्याची मागणी करत पोलीस अधिकारी-अंमलदारांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली.महिला पोलीस कर्मचारी दिघे व फटांगरे यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप होता.याशिवाय विजय कुटे हा पोलीस ठाण्याच्या आवारात पेट्रोलची बाटली घेऊन आला असून स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.

या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.सदर खटल्याची सुनावणी जुन्नर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील जी. के.खोडे यांनी कामकाज पाहिले.न्यायालयात साक्षीदारांचे जबाब,परिस्थितीजन्य पुरावे तसेच सरकार पक्षाच्या युक्तिवादादरम्यान उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील संबंधित न्यायनिवाड्यांचे दाखले सादर करण्यात आले.न्यायालयाने उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून दोन्ही आरोपींना भारतीय दंड विधान कलम ३५३ अन्वये दोषी ठरविले.

दोन्ही आरोपींना एक वर्षाचा साधा कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड,तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.

पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार,जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून स.पो.नि. तावरे,म.पो.हवा.मनिषा ताम्हाणे व म.पो.कॉ. वृषाली भोर यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *