बेल्हे:-कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर गुंजाळवाडीफाटा येथे रविवारी दुपारी दोनच्या सुमारास अपघाताची घटना घडली.अपघाताची माहिती मिळताच बेल्हे येथील लामखडे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अजित लामखडे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेण्याचा निर्णय घेतला.मात्र,त्यावेळी रुग्णवाहिकेचा चालक जागेवर उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वेळ न दवडता डॉक्टरांनी स्वतःच रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हाती घेतले आणि थेट अपघातस्थळ गाठले.
अपघातस्थळी पोहोचल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेत घेण्यात आले.त्यानंतर डॉ.लामखडे यांनी जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात आल्याने तिच्यावर तातडीने उपचार सुरू करता आले.वेळीच उपचार मिळाल्याने महिलेचा जीव वाचला,अशी माहिती समोर आली आहे.
अपघाताच्या वेळी काही मिनिटांचा विलंबही जखमींच्या जीवावर बेतू शकतो.मात्र,रुग्णवाहिका चालक उपलब्ध नसतानाही‘आधी रुग्णाचा जीव,बाकी सर्व नंतर’ या भावनेने डॉक्टरांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत घटनास्थळी धाव घेतली.डॉक्टर म्हणून उपचार करण्या सोबतच गरजेच्या वेळी रुग्णवाहिकेचे चालक होऊन जखमींच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची तत्परता नागरिकांच्या मनाला भावली.
ग्रामीण भागात अपघाताच्या घटना घडल्यानंतर वेळेत वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.अशा परिस्थितीत डॉ.अजित लामखडे यांनी दाखवलेली तत्परता ही केवळ वैद्यकीय सेवा नसून माणुसकीचे जिवंत उदाहरण असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान,या घटनेनंतर डॉ.अजित लामखडे यांच्या तत्परतेचे आणि माणुसकीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.‘डॉक्टरांनी वेळ न दवडता स्वतः रुग्णवाहिका चालवून जखमींचा जीव वाचवण्यासाठी घेतलेली धाव निश्चितच प्रेरणादायी आहे,’अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.