ज्येष्ठ नागरिकाला बसस्थानकाऐवजी बायपासवर सोडले; एसटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

आळेफाटा : प्रवाप्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आळेफाटा-बेल्हे मार्गावर घडल्याचा आरोप आहे.सुमारे ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिक हरिदास ताजवे यांना बेल्हे बसस्थानकाऐवजी बसस्थानका पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील बायपासवर उतरवण्यात आल्याने त्यांना भर उन्हात मोठा त्रास सहन करावा लागला.

ताजवे हे आळेफाटा येथून बेल्हेकडे जाण्यासाठी पालघर आगाराच्या एसटी बसमध्ये बसले होते.ही बस कल्याणहून अहिल्यानगरच्या दिशेने जात होती.आळेफाटा येथे ताजवे यांनी बेल्हेचे तिकीट काढले.त्यांच्या तिकिटावर ‘एच. डी. भुसारी’असे वाहकाचे नाव नमूद असल्याचे सांगण्यात आले आहे.तिकिटावर १५:३७ अशी वेळही नमूद आहे.

वयाच्या ८०व्या वर्षी भर उन्हात बायपासवरून चालत जात असताना ताजवे यांना उष्णतेचा तडाखा बसला. त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत त्यांना उचलले आणि उपचारासाठी रुग्णालयात नेले.प्राथमिक उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते घरी पोहोचले.

या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवण्याची जबाबदारी एसटीची नाही का,असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे,ताजवे यांनी बसवरील फलक वाचला नसल्याने त्यांना ही बस कोणती होती हे सांगता आले नाही.मात्र त्यांनी घेतलेल्या तिकीटावर वाहकाचे एच डी भुसारी असे नाव आहे.८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला बसस्थानकाऐवजी एक किलोमीटर दूर बायपासवर उतरवणे कितपत योग्य?असा सवाल आता उपस्थित होत आहे.वृद्ध प्रवाशाला उन्हात बायपासवर सोडणे.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’या ब्रीदवाक्याला हा प्रकार शोभतो का?असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.

या संपूर्ण प्रकाराची राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाच्या विभागीय नियंत्रक आणि ठाणे जिल्ह्याच्या विभागीय अधिकारी तसेच पालघर एसटी आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, या प्रकारात दोषी असलेल्या तिकिटावरील वाहकाचे नाव एच.डी.भुसारी असल्याने संबंधित कर्मचाऱ्याची बाजू जाणून घ्यावी आणि दोष आढळल्यास योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *