पारनेरमध्ये गुटखा कारवाईनंतर पुरवठ्याचे धागेदोरे बेल्ह्याकडे; राजुरी-बांगरवाडी परिसरातील संशयित पुरवठादारांवर कारवाई कधी?

पारनेर : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधी तंबाखूच्या विक्रीविरोधात पारनेर तालुक्यात झालेल्या कारवाईनंतर गुटख्याच्या पुरवठ्याचे धागेदोरे बेल्ह्याकडे पोहोचले आहेत.

लोणीमावळा येथे दोन पानटपऱ्यांवर कारवाई करत पोलिसांनी ५ हजार ३३६ रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला असून,या प्रकरणातील आरोपींनी हा माल अर्जुन सोपान यादव(रा.यादववाडी बेल्हा, ता.जुन्नर,जि.पुणे)याच्याकडून घेतल्याचे सांगितल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.अर्जुन यादव हा या प्रकरणात फरार असल्याचेही पोलिसांनी नोंदवले आहे.

१५ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोणीमावळा येथे कारवाई केली.ज्ञानेश्वर सुपर मार्केट मधून विलास भागुजी शेंडकर याच्या ताब्यातून ३ हजार ७१२ रुपयांचा,तर इनाया पान स्टॉलमधून समीर सत्तार शेख याच्या ताब्यातून १ हजार ६२४ रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

विशेष म्हणजे,दोन्ही कारवायांमध्ये अर्जुन यादव याचे नाव गुटखा पुरवठादार म्हणून समोर आल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.त्यामुळे बेल्ह्यातून पारनेर तालुक्यात प्रतिबंधित गुटख्याचा पुरवठा नेमका कोणत्या मार्गाने होत होता? या साखळीत आणखी कोण कोण सहभागी आहेत? याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

आळेफाटा,राजुरी,बांगरवाडी परिसरातील संशयितांवर कारवाई कधी?

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजुरी,आळेफाटा, बांगरवाडी आणि परिसरातही प्रतिबंधित गुटख्याच्या पुरवठ्याबाबत चर्चा होत असताना,या भागातील संभाव्य पुरवठा साखळीची पोलिसांकडून चौकशी होणार का,असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

पारनेरमधील कारवाईनंतर आता तपासाची दिशा बेल्हे, बांगरवाडी,राजूरी,आळेफाटा परिसराकडे वळते का?तसेच अर्जुन यादव याचा शोध लागल्यानंतर गुटखा साठाच्या गोडाऊनवर कारवाई होणार का?गुटखा पुरवठ्याच्या साखळीतील आणखी कोणाची नावे समोर येतात,याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *