मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा करणार आ.नीलेश लंके यांचे प्रतिपादन

राळेगण सिध्दी(प्रतिनिधी):राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी आपण कोटयावधी रूपयांचा निधी मंजुर करून आणला असून पारनेर-नगर मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा करणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.
राळेगण सिध्दी येथील पद्मावती, पठारे वस्ती ते मापारी वस्ती, कदम वस्ती, फटांगडे वस्ती या ४६ लाख ७४ हजार १९६ रूपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी आ. लंके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सरपंच जयसिंग मापारी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना आ. नीलेश लंके म्हणाले, पारनेर-नगर मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर आपण मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये विकासाची गंगा पोहचविण्याचा निर्धार केलेला आहे. याच निर्धाराप्रमाणे प्रत्येक गावामधील विकास कामांचे नियोजन करण्यात येऊन प्राधान्यक्रमाने कामे मार्गी लावण्यात येत आहेत. सुरूवातीस महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेकडो कोटी रूपयांची विकास कामे मार्गी लावण्यात यश मिळाले. कोरोनाचे संकट ओढावल्यामुळे विकास कामांच्या निधीला कात्री लागलेली असतानाही अजितदादा पवार यांनी पारनेर-नगर मतदारसंघाला निधी कमी पडू दिला नाही. आगामी दिड वर्षाच्या कालावधीमध्ये मोठया प्रमाणावर विकास कामे मार्गी लागणार असून आपण त्यात कोठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही आ. लंके यांनी दिली.

राळेगण सिध्दी येथील रस्त्याच्या कामाचे आ. नीलेश लंके यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले.(छाया : श्रीकांत चौरे )

माजी सरपंच माधव मापारी, उपसरपंच मंगल उगले, दादाभाऊ पठारे, गणपतराव मापारी, अमोल मापारी, अमोल पठारे, दादाभाऊ मापारी, गणेश पठारे, राजू भालेकर, महेंद्र गायकवाड, विलास औटी यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

▪️दोन वर्षानंतर काम मार्गी !

या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव आ. नीलेश लंके यांनी दोन वर्षांपूर्वीच दिला होता. या कामाला मंजुरीही मिळाली होती. मात्र राज्यात सत्ताबदल होऊन शिंदे-फडणवीसांचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने या कामासह इतर कोटयावधींच्या कामांना स्थगिती दिली होती. अजितदादा पवार व त्यांचे सहकारी सरकामध्ये सहभागी झाल्यानंतर पवार यांनी या कामांवरील स्थगिती उठविल्याने दोन वर्षानंतर या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.