पारनेर प्रतिनिधी(श्रीकांत चौरे): पारनेर तालुक्यातील शिक्षकांची व सैनिकांची पंढरी असलेल्या निर्मल ग्राम गारगुंडी गावातील माजी सैनिक प्रमोद तुकाराम फापाळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परिक्षेत उत्तीर्ण होऊन GST विभागामध्ये Tax Assistant म्हणून निवड झाली आहे. प्रमोद फापाळे हे माजी पोलीस हवलदार व गारगुंडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम फापाळे यांचे सुपुत्र आहेत.
प्रमोद यांनी आपल्या शालेय जीवनातच प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न मनात धरले होते. त्यांची शरीरयष्टी चांगली असल्याने अनेक मैदानी खेळांत ते निपुण्य मिळवत असत व सैनिक होण्याचा संकल्प पण त्यांच्या मनात होता, यासाठी त्यांनी शालेय जीवनात जोरदार तयारी केली होती. शालेय जीवनात मनात धरलेले सैनिक होण्याचे स्वप्न १२ नंतर लगेच पुर्ण झाले व प्रमोद हे आर्मीमध्ये पहिल्याच प्रयत्नांत दाखल झाले.
पुणे येथे बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुपमध्ये सैनिक म्हणून भरती झाल्यानंतर प्रमोद यांनी हिमाचल प्रदेश, चंदीगड, आसाम येथे खडतर ठिकाणी देशाच्या संरक्षणांची जबाबदारी पार पाडली, दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये लेह, लडाख येथे पण प्रमोद यांनी २ वर्षे देशसेवा बजावली असून देशसेवेतील शिस्त, वक्तशीरपणा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला असल्याचे त्यांच्या जीवनातून दिसून येते आणि त्याचाच परिणाम त्यांनी सेवानिर्वुत्त झाल्यानंतर पण प्रशासकीय सेवेत दाखल होऊन देशसेवा करण्याचं ठरवल होत.
परंतु प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न दूर राहते की काय अशी हुरहूर त्यांना कायम होती. मनात धरलेले स्वप्न पुर्ण करण्याची जिद्द मनात ठेवून त्यांनी आर्मीमध्ये असताना देशाचे संरक्षण करत विविध पदांची जबाबदारी पार पाडत अभ्यासात खंड पडू दिला नाही. त्यांनी देशसेवा करत असताना पुणे विद्यापीठातून बहिस्थ पदवीचे शिक्षण पुर्ण केले व अभ्यास कायम चालू ठेवला.
तब्बल १७ वर्षे व १ महिने देशात विविध ठिकाणी देशसेवा करुन सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याच्या दृष्टीने लगेच तयारी सुरु केली व पुण्यात खाजगी क्लासेसचे मार्गदर्शन घेऊन अभ्यासाची जोरदार तयारी केली. सेवानिवृत्त झाल्यावर कुटुंबाची जबाबदारी पत्नी सौ.साधना यांच्या साथीने उचलत मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देउन स्वतः पण १५ तास अभ्यास करत प्रमोद यांनी एमपीएससी परीक्षा उतीर्ण केली. प्रमोद यांना याअगोदर मंत्रालयात एमपीएससीमधूनच क्लर्कची पोस्ट मिळाली होती. मध्यंतरी कोरोनाच्या काळात अनेक परीक्षा रखडल्या होत्या आणि टॅक्स असिस्टंटचा निकाल पण थांबला होता परंतु प्रमोद यांनी कोणत्याही प्रकारे हार न मानता शालेय जीवनातील आपल्या प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याच्या स्वप्नाला अखेर गवसणी घातली व मनात असलेला संकल्प पुर्ण केला.
मनात संकल्प ठेवला व जिद्दीने तयारी करत अभ्यास केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि अभ्यास करताना वयाचं पण बंधन येत नाही अशी प्रतिक्रिया प्रमोद यांनी दिली. देशसेवेत लागलेली शिस्त, मनात असलेली जिद्द व लहान वयात पाहिलेले स्वप्न या सर्वांच्या बळावर मी इथपर्यंत पोहचलो असल्याचेही प्रमोद यावेळी म्हणाले, माझ्या यशात माझे कुटुंबीय, शिक्षक, आर्मीतील शिक्षक, सहकारी, मित्रपरिवार यांचे मोठे योगदान असून त्यांच्या पाठींब्याने व सहकार्यानेच मी या पदावर पोहचलो असल्याची भावना पण प्रमोद यांनी व्यक्त केली आहे. तसेच यापुढेही आपण आणखीन मोठ्या पदावर जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा संकल्प पण प्रमोद यांनी बोलून दाखवला आहे.
प्रमोद यांच्या यशाबद्दल पारनेर तालुक्यात त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून जिल्हयाचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार निलेश लंके, माजी आमदार विजयराव औटी, नंदकुमार झावरे, जि.प.माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजपा नेते विश्वनाथ कोरडे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, माजी सभापती काशिनाथ दाते, सुदाम पवार, गणेश शेळके, राहुल झावरे, अरुण ठाणगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे, उपसभापती बापू शिर्के, गारगुंडी गावच्या सरपंच प्रमिला फापाळे, उपसरपंच प्रशांत झावरे पाटील, चेअरमन बाबाजी फापाळे, व्हा.चेअरमन विलास झावरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक मंडळ, ग्रामस्थ यांनी आनंद व्यक्त केला आहे व प्रमोद यांचे अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.