एमआयडीसीसाठी दसऱ्यानंतर ढवळपुरीत सर्वेक्षण

पारनेर(श्रीकांत चौरे):ढवळपुरीसारख्या दुर्गम भागात एमआयडीसी झाल्यास या भागाचे नंदनवन होईल, यासाठी आपण प्रयत्नशील आहे. येत्या दसऱ्यानंतर संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत सर्व्हे करणार असल्याचे सांगतानाच के.के. रेंजच्या नावाखाली काही जण राजकीय ओळी भाजून घेण्याचे काम करीत आहेत.मात्र, के.के. रेंजचे भूत पुन्हा मानगूटीवर बसणार नसल्याचा शब्द आमदार नीलेश लंके यांनी नवरात्रीच्या पर्वात दिला.

ढवळपुरी जिल्हा परिषद गटाच्या मोहटादेवी दर्शनाचा शुभारंभ शुक्रवारी भाळवणी येथे करण्यात आला.यावेळी आमदार लंके बोलत होते. दुर्गम आदिवासी भागातून आलेल्या महिला वर्गांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते आमदार लंके यांनी व्यासपीठावरून न बोलता थेट उपस्थित महिला भगिनींच्या प्रांगणात जात संबोधित केले.

यावेळी बाबासाहेब तरटे,अशोक कटारिया,संभाजी रोहोकले, सुदाम पवार,प्रा.संजय लाकुडझोडे, अॅड.राहुल झावरे, श्रीकांत चौरे , रविंद्र राजदेव , भाऊ साठे , सतिष गंधाक्ते , सुवर्णा धाडगे,भागाजी गावडे,अशोक रोहोकले,प्रकाश राठोड,सतीश भालेकर,अनिल गंधाक्त्ते,अमोल पवार,सपना आडसूळ,शिवाजी लावंड,दादा शिंदे,सचिन पठारे,संदीप चौधरी,दत्ता कोरडे,अभयसिंह नांगरे,संभाजी नरसाळे, संदीप रोहोकले, डॉ. नितीन रांधवण, प्रा.बबनराव भुजबळ,आबासाहेब चेमटे,जयसिंग दावभट,शिवनाथ लोंढे,संतोष चेमटे,भाऊ ठोकळ आदी.उपस्थित होते.

आ.लंके म्हणाले की, निवडणुका जवळ आल्यानंतरच काही जणांना देवदर्शन तसेच दिवाळी फराळाची आठवण होते नीलेश लंके मात्र त्यातला नाही. निवडणुका असो किंवा नसो मतदार संघातील माझ्या माता भगिनींना देवदर्शन घडविणे हे माझे कर्तव्य समजतो. याच भावनेतून आपण देवदर्शन यात्रेचे आयोजन करीत असतो.या पुढील काळातही माता-भगिनींसाठी देवदर्शन घडविणार असल्याचे सांगत ढवळपुरी गटातील दुर्गम भागातील गावातील महिलांचा आगळावेगळा उत्साह पाहता अभिमानाने उर भरून येतो असेही हा लंके म्हणाले.

आपले जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे. शेती पिकली तरच समृद्धी येईल. शेतकरी आनंदी होईल. मध्यंतरीच्या काळात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती मात्र गणेशोत्सवाच्या काळात निसर्गाने साथ दिल्याने शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नवरात्रीच्या पर्वातही निसर्ग दिलासा देईल अशी अपेक्षा होती मात्र, नवरात्रीत पावसाने साथ दिली नसल्याचे सांगत निसर्गाने बळीराजाला साथ द्यावी.कारण शेतकरी समाधानी झाला तरच सर्वच समाधानी असल्याने बळीराजाला चांगले दिवस यावेत यासाठी आ. लंके यांनी मोहटा देवीला साकडे घातले.

▪️ लोकनेता गाण्यावर धरला ताल

ढवळपुरी,वनकुटे,पळशी या दुर्गम आदिवासी भागातील आलेल्या महिलांचा उत्साह पाहता लंके यांनी त्यांना पुन्हा नृत्य करू द्या असे ध्वनीक्षेपकावरून सांगितल्यानंतर लोकनेता मिळायचा नाय आमदार नीलेश लंके साहेबांसारखा या डीजे वरील गाण्यावर उपस्थित वयोवृद्ध महिलांनीही ताल धरला.

▪️सेल्फीसाठी गर्दीच गर्दी

मोहटादेवी दर्शन यात्रेचा शुभारंभ करण्यासाठी आ.लंके हे वेळेवर पोहोचले होते.भाळवणीच्या कापरी चौकात ते सुमारे तासभर थांबून होते येथे व कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी उपस्थितांनी मोठी गर्दी केली.हसतमुखाने गळ्यात हात घालत आ.लंके यांनी सर्वांसमवेत फोटोसेशन केले.

▪️ खरोखरच श्रावणबाळ !

मोहटादेवी यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीलेश लंके यांचा उल्लेख आधुनिक श्रावणबाळ असा केला होता याचा प्रत्यय देखील आजच्या देवदर्शन यात्रेत आला.सर्व महिला भगिनींची आस्थेवाईकपणे विचारपूस करणारे आमदार लंके हे खरोखर श्रावणबाळच असून त्यांच्यामुळेच गेल्या सात वर्षांपासून आम्हाला देवदर्शनचा लाभ मिळतो अशा भावना महिला वर्गांनी व्यक्त केल्या.

▪️पामडी परिधान केलेल्या बंजारा महिलांचे नृत्य

ढवळपुरी, पळशी येथील बंजारा समाजाच्या सुमारे २५० महिलांनी पारंपारीक पामडी परिधान करून या यात्रेत देवीचे गाणी बोली भाषेत सादर करीत नृत्य केले. एकाच रंगाच्या पामडी परिधान केलेल्या या महिलांच्या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. या माता भगिनींचे नृत्य गर्दीमुळे आपणास पाहता आले नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे आ. नीलेश लंके यांनी सांगितले.