हजरत कमरअली दुर्वेश दर्शन यात्रेस उत्सफुर्त प्रतिसाद हजारो मुस्लिम माता भगिनींचा सहभाग

पारनेर(श्रीकांत चौरे):आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठाण व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्गा दर्शन यात्रेस मुस्लिम माता भगिनींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.

आ. नीलेश लंके यांनी नवरात्रोत्सवात मतदार संघातील माता भगिनींसाठी मोहटादेवी दर्शन यात्रेचे आयोजन केले होते. १ लाख ३० हजारांहून अधिक माता भगिनींनी आठ दिवस सुरू असलेल्या या यात्रेत सहभाग नोंदवित विक्रम प्रस्तापित केला. नवरात्रोत्सवानंतर कोजागरी पोर्णिमेचे औचित्य साधून मुंबई शहर व उपनगरात वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी एकविरा दर्शन यात्रेचेे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेतही दहा हजारांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला होता. मोहटादेवी यात्रोत्सवादरम्यान आ. लंके यांनी मुस्लिम महिलांसाठी खेड शिवापुर यात्रेचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मंगळवारी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

नुर कुरेशी,फिरोज हवालदार, रमीज राजे, अन्वरभाई शेख, तौफीक पटेल, जब्बार शेख, मुजीब नवाब शेख, पाकीजा शेख, नगरसेवक डॉ. सादीक राजे, शेख इमरान, शेख अतिक, शाहरूख शेख आदींनी या यात्रेच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

▪️पुणेकरांचाही पुढाकार

या यात्रेच्या नियोजनामध्ये पुणेकरांनीही पुढाकार घेत सहकार्याचा हात दिला. शिवभूमी शिक्षण संस्थेचे सचिव संग्राम कोंंडे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते जितेंद्र काेंंडे,खेड शिवापुरचे माजी सरपंच अनंता कोंडे, शहाजी पवार, अजित कोंडे, श्रीमंत पवार, महेंद्र पवार हे यात्रेच्या नियोजनात अग्रभागी होते.

▪️दरवर्षी आयोजन

मतदार संघातील मुस्लिम माता भगिनींसाठी यंदाप्रमाणे दरवर्षी खेड शिवापुर यात्रेचे आयोजन करण्याची घोषणा आ. नीलेश लंके यांनी यावेळी केली. मतदारसंघातील प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृध्दी, उत्तम आरोग्य, समाजात एकता, बंधुता, सौहार्दाची भावना वाढीस लागो अशी प्रार्थना आ. लंके यांनी यावेळी केली.

▪️प्रथमच मोठया संख्येने महिला

या दर्ग्याच्या दर्शनासाठी आजवर प्रथमच एका दिवशी इतक्या मोठया प्रमाणावर महिलांनी हजेरी लावल्याचे दर्ग्याच्या व्यवस्था पाहणाऱ्या विश्‍वस्तांकडून सांगण्यात आले. शिस्तबध्द पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेचे खेड शिवापूरकरांनी कौतुक केले.

▪️बिर्याणी, पायनापल शिऱ्याचा बेत

खेड शिवापूर येथे सर्व बसेस पोहचल्यानंतर तेथील शाळेच्या प्रांगणावर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेकरू महिला व पुरूष भाविकांसाठी बिर्याणी व पायनापल शिऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाकाहारी भाविकांच्याही भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

▪️जीवा भावाचे टीम वर्क

कोणताही उपक्रम राबवायचा असेल तर त्यास टीम वर्क लागते. आमचे हे टीम वर्क जीवा भावाचे आहे. दिवाळी फराळाचे आमंत्रण जिल्हयातील गावागावांमध्ये आमची टीम दोन दिवसांत पोहचली आणि ४० हजार पत्रिकांचे वितरण करण्यात आले. सामाजिक काम करताना प्रत्येक समाजाला आपण कसा न्याय देउ शकू याचा प्रयत्न केला जातो. मतदारसंघात जातीय सलोखा राखण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत असतो. त्यामुळे कोठेही जातीय तेढ निर्माण झाल्याचे उदाहरण घडत नाही~आ. नीलेश लंके

▪️ही तर उभ्या महाराष्ट्राची इच्छा !

शरद पवार व अजितदादा पवार यांनी पुन्हा एकत्र यावे हे मलाच काय उभ्या महाराष्ट्राची इच्छा असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी दर्गा दर्शन यात्रेदरम्यान खेड शिवापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.शरद पवार व अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे का असा प्रश्‍न आ. लंके यांना विचारण्यात आला असता त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. लंके म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून आम्ही मोहटादेवी यात्रेचे आयोजन करत आहोत. यंदा १ लाख ३७ हजार महिलांना मोहटादेवी यात्रा घडविण्यात आली. यावर्षी मुस्लिम महिलांकडून खेड शिवापूरच्या दर्ग्याच्या दर्शनाची इच्छा प्रदर्शित केल्यानंतर आपण या यात्रेचे आयोजन केल्याचे लंके म्हणाले.