शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तनकार, प्रवचनकार यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

जुन्नर, दि.(प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुर लोकसभा मतदारसंघातील कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांचा शुभारंभ आज(दि. १४ रोजी) जुन्नर येथील कोंडाजीबाबा डेरे आश्रम येथे होणार आहे.

‘सदैव जे असती हरिनामात दंग, असावेत सदा ते आरोग्य संपन्न’  या खासदार डॉ. कोल्हे यांच्या संकल्पनेतून आगळ्यावेगळ्या पद्धतीने शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असून १४ ते १७ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी दि. १४ डिसेंबर रोजी जुन्नरला कोंडाजीबाबा डेरे आश्रम येथे होईल, तर शिरुर – हवेली विधानसभा मतदारसंघासाठी दि. १५ रोजी तळेगाव ढमढेरे येथील मार्केट कमिटी सभागृहात आणि भोसरी व खेड – आळंदी विधानसभेसाठी दि. १६ रोजी आळंदी देवाची येथील अमृतनाथ स्वामी महाराज संस्था येथे तसेच आंबेगाव-शिरूर विधानसभा दि. १७ रोजी मंचर येथील मार्केट कमिटी सभागृहात हे शिबिर होणार आहे.

या शिबिरात शिरुर लोकसभा मतदारसंघातील कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्या Vitals Test, Cardiac, Oral Cancer, Breast Cancer, ENT, Blood, Eye examination आदी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. तसेच प्रत्येकी ६ लाखांचे मोफत विमा कवच देण्यात येणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील कीर्तनकार आणि प्रवचनकार यांना मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, कीर्तनकार आणि प्रवचनकार वर्षभर ठिकठिकाणी फिरुन कीर्तन, प्रवचनाद्वारे समाज प्रबोधन व लोकप्रबोधनाचे कार्य करीत असतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्याकडून आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होतं. म्हणूनच आम्ही या कीर्तनकार आणि प्रवचनकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. त्याचबरोबर त्यांना ६ लाखांचे विमा सुरक्षा कवचही देत आहोत, अशी माहिती खासदार डॉ. कोल्हे यांनी दिली.