ऍडमिशन देतो म्हणून २ लाखाची फसवणूक

अहमदनगर,दि.(महेश कांबळे)-मित्रांच्या मुलीला बीएएमएस ला ऍडमिशन करून देण्याच्या नावाखाली २ लाख रुपये घेतले व फसवणूक केली म्हणून पुणे येथील नितीन सुधाकर साडेकर याच्या  विरुद्ध कोतवालीत धनंजय शरदचंद्र गटणे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी व्यावसायिक धनंजय गटणे(वय ५० रा.कुंभार गल्ली, नालेगाव) यांनी  दिलेल्या फिर्यादीवरून पिंपरी चिंचवड (पुणे) येथील क्रिस्टल कॅटेलिस्ट एज्युकेशन  कन्सल्टन्सी संस्थेचा नितीन साडेकर (रा.रोझवुड सोसायटी, पिंपळे सौदागर, पिंपरी -चिंचवड, पुणे) याच्या विरोधात कोतवाली  पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

गटणे यांचे मित्र गौतम आढाव यांच्या  मुलीचे ‘बीएएमएस’ला अॅडमिशन करायचे असल्याने गटणे यांचे दुसरे मित्र विश्वजित  देशपांडे (रा.पुणे) यांच्या मार्फत नितीन सुधाकर साडेकर याच्याशी संपर्क झाला.त्याने मॅनेजमेंट  कोट्यामधून अॅडमिशन घेण्यासाठी तुमचे  बजेट किती आहे,अशी विचारणा केल्यानंतर  गटणे यांनी त्याला मित्राचे बजेट १० ते १२ वि लाखांचे असल्याचे सांगितले.त्याने अॅडमिशन  करून देण्यासाठी दोन लाख रुपये अॅडव्हान्स मागितला.

दरम्यान गटणे यांनी त्याला १९ नोव्हेंबर रोजी गुगल पे वरून २५ हजार रुपये पाठविले.त्यानंतर बागडपट्टी येथील फोम हाऊस शॉपवर आढाव यांनी दिलेले एक लाख ७५ हजार रुपये गटणे यांनी साडेकर याला दिले.शिवाय त्यानंतर त्याने अॅडमिशनसाठी २० ते २५ लाख रूपये लागतील असे सांगितल्याने गटणे यांनी त्याला दोन लाख रुपये परत मागितले.परंतु त्याने आज देतो, उद्या देतो असे सांगून दोन लाख रुपये परत दिले नाही व अॅडमिशनही करून दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.