पारनेरच्या कार्तिकस्वामी मंदिराचा लोकवर्गणीतून होणार जीर्णोद्धार

पारनेर(श्रीकांत चौरे):पारनेर शहरातील बुगेवाडी परिसरात श्री खंडोबा मंदिरानजीक असलेल्या श्री कार्तिक स्वामी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी लोकवर्गणी करण्यात येत आहे. राज्यात कार्तिक स्वामींची तीनच पुरातन मंदिरे असून त्यापैकी एक पारनेर शहरात आहे.
श्री खंडोबा मंदिर परिसरातील कार्तिक स्वामींचे पुरातन मंदिर जीर्ण झाल्याने त्याचा जीर्णोद्धार करण्याची संकल्पना स्थानिक नागरीकांनी मांडली. खंडोबा मंदिरात त्यासंदर्भात बैठक घेण्यात आल्यानंतर जीर्णोध्दाराच्या संकल्पनेस सर्वांनीच मान्यता दिली. याच बैठकीत सुमारे सहा लाख रूपयांची लोकवर्गणीही संकलित झाली. सुमारे वीस लाख रूपये खर्चाचा संकल्पीत मंदिराचा आराखडा तयार करण्यात आला असून नव्या मंदिरास दोन दरवाजे ठेवण्यात येऊन जेणेकरून मंदिरात गर्दी झाल्यानंतर सुलभ दर्शन होईल याची काळजी घेण्यात आली आहे.
खंडोबा मंदिरात पार पडलेल्या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष दत्ताशेठ कुलट, माजी उपसरपंच विजय डोळ, नगरसेवक सुभाष शिंदे, सहदेव तराळ, रमेश आडसूळ, दत्तात्रय आंबुले, ठकाराम बुगे, भगवंत कुलट, बाबाजी पोटे, भास्कर पोटे, नामदेव बुगे, बबन चत्तर, ज्ञानदेव पोटे, ज्ञानदेव वीर, सुभाष कुलट, साहेबराव चत्तर, बाबाशेठ कुलट,शिवाजी महादू नाईक, वसंत किसन नाईक व नाईक परिवार,सचिन शेटे, सुनील पोटे, काशिनाथ बुगे, कोंडीभाऊवीर, बापू बुगे, रघुनाथ वीर, बाबा पोटे, नारायण वीर सुभाष पोटे आदी उपस्थित होते.

▪️राज्यात तीनच पुरातन मंदीरे

नाशिक शहर, पुण्यातील पर्वती व पारनेर येथे कार्तिक स्वामींची पुरातन मंदिरे आहेत. कृतिका नक्षत्रात या मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.

▪️कृतिका नक्षत्र पर्वात लक्ष्मीप्राप्ती

कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्र असताना श्री कार्तिक स्वामींचे घेतले असता लक्ष्मीप्राप्ती होते अशी पुरातन श्रध्दा आहे. या पर्वामध्ये स्त्रियांनाही कार्तिक स्वामीचे दर्शन घेता येते. इतर दिवशी मात्र या मंदीरात स्त्रीयांना प्रवेश करण्यास मज्जाव असतो.