नारायणगाव – आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून तत्पूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने शरदराव लेंडे (प्रदेश संघटक), सईद पटेल (प्रदेश सदस्य), दिलीप कोल्हे (जिल्हा संघटक), अंकुश आमले (जुन्नर तालुका संघटक) मोहित ढमाले (समन्वयक जुन्नर तालुका) आदींच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची तयारी वेगाने सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाध्यक्ष मा. आमदार जगन्नाथबापू शेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने प्रदेश संघटक पदावर मा. जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे यांची तर प्रदेश सदस्यपदी सईद पटेल यांना नियुक्तीचे पत्र दिले. त्याचबरोबर जिल्हा संघटक पदावर दिलीप कोल्हे, तालुका संघटक पदावर अंकुश आमले आणि तालुका समन्वयक पदावर मोहित ढमाले यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वागत केले असून पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारानुसार भविष्यात मजबूत पक्षसंघटना उभारण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर कठीण परिस्थितीतही पवारसाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून पक्षकार्यासाठी झटून काम करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.