आळेफाटा(प्रतिनिधी)बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळून आल्याप्रकरणी बेल्हे गावातील जय बजरंग कोल्ड ड्रिंक्स आणि ज्यूसबार या विक्रेत्याला अन्न आणि सुरक्षा प्रशासनाने नोटीस जारी केली.
अन्न व औषध प्रशासनाने अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा विक्रेता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण परवान्याशिवाय काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे.रस आणि थंड पेये देण्यासाठी वापरलेल्या खाद्य बर्फात गोठलेल्या उंदराचा व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने चौकशी सुरू केली.
सहआयुक्त अर्जुन भुजबळ,सहायक आयुक्त एस.बी. कोडगिरे,अन्न सुरक्षा अधिकारी बी.ए.शिंदे,एस.एन. जगताप,ए.जी.गायकवाड यांनी छापा टाकला.
पारनेर तालुक्यातील निघोज गावातील एका कंपनीकडून बर्फाचे तुकडे खरेदी केल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले.एफडीए पुणे पथकाने शुक्रवारी अहमदनगर टीमला बर्फ निर्मिती कारखान्याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान सुमारे ३०० किलो खाद्य बर्फाचा साठा नष्ट केला आहे.आम्ही ज्यूस सेंटरमधून बर्फ व इतर खाद्यपदार्थांचे नमुने घेतले असून ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले असल्याचे सहायक आयुक्त एस.बी. कोडगिरे यांनी सांगितले.
अन्न आणि सुरक्षा प्रशासनाने अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ आणि अन्न सुरक्षा आणि मानक नियम २०११ नुसार परवाना नसताना गेल्या चार वर्षांपासून अन्न सुविधा चालवणाऱ्या बेल्हे येथील या विक्रेत्याला नोटीस जारी केली असल्याचे ते म्हणाले.